भीमाशंकर दर्शन : भाविकांच्या सोयीसाठी ‘पीएमपीएमएल’च्या निगडी आगारातील 12 मिडी बसेस उपलब्ध
पिंपरी – भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी ‘भीमाशंकर’ हे सहावे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात अनेक भाविक भीम शंकराच्या दर्शनासाठी येतात. त्या सर्व भाविकांसाठी पीएमपीएमएलतर्फे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्रावण महिन्यात भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलने श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवार आणि सोमवारी भीमाशंकर येथील पार्किंग ते भीमाशंकर मंदिर अशी 24 तास शटल सेवा देण्याची योजना आखली आहे.
या शटल सेवेसाठी पीएमपीएमएलच्या निगडी आगारातून डिझेलवर धावणाऱ्या १२ मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही शटल बस सेवा 7 आणि 8 ऑगस्ट, 14, 15 आणि 16 ऑगस्ट आणि 21 आणि 22 ऑगस्ट (श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवार आणि सोमवारी) भाविकांसाठी 24 तास उपलब्ध असेल. 14, 15 आणि 16 ऑगस्टला सलग सुट्ट्या असल्याने रविवार, सोमवार आणि मंगळवारीही शटल सेवा सुरू राहणार आहे.
या बस निगडी आगारातून श्रावण महिन्यातील दर रविवारी पहाटे चार वाजता सुटणार असून सोमवारी रात्री उशिरा या सर्व बस निगडी आगारात परतणार आहेत. मिडी बसेससाठी लागणारे डिझेल भीमाशंकर येथील सर्व्हिस व्हॅनमधून उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्तीसाठी ब्रेक व्हॅनही त्या ठिकाणी उपलब्ध असेल.
तरी श्रावण महिन्यातील दर रविवारी आणि सोमवारी भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांनी या PMPML शटल बस सेवेचा भीमाशंकर येथील पार्किंग ते भीमाशंकर मंदिरापर्यंत लाभ घ्यावा ही विनंती. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक प्रवासासाठी पीएमपीएमएलकडून विशेष सेवा दिली जाते. श्रावण महिना पावसाळ्यात असून मंदिर वनपरिक्षेत्रात असल्याने नागरिकांना सहज दर्शनासाठी जाता येत नाही, त्यामुळे पीएमपीएमएलने ही सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीच्या काळातही पीएमपीएमएलतर्फे भाविकांसाठी विशेष सेवा देण्यात आली होती.