…म्हणून मला पैलवान म्हटलेलं खूप आवडतं – आमदार महेश लांडगे
- आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिकाटी बाळगावी – आमदार महेश लांडगे
पिंपरी – “माझे आजोबा पट्टीचे पैलवान होते. त्यांनी ध्येय आणि चिकाटी बाळगून त्यांच्या क्षेत्रात उत्तम करिअर केले, तेव्हापासून मलाही कुस्ती आणि पैलवानकीचे वेड जडले आणि तेच ध्येय मनाशी बाळगून एक चांगला पैलवान होण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हापासून मला पैलवान महेश लांडगे म्हंटलेले आवडते, अशा खूशमिश्कील शब्दांत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या पैलवानकीची आठवन सांगत आपल्या वडिलधा-या व्यक्तींची आपल्याकडून काय अपेक्षा असते, याकडेही त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
एके दिवशी मी मित्रांसोबत कुस्तीच्या फडात कसरत करत होतो. तिकडे कोनाड्यात बसलेले माझे आजोबा आश्रू ढाळत होते. माझ्या मित्रांनी त्यांच्याकडे माझे लक्ष वेधले. मी तिकडे निघालो असता मास्तरानी (उत्तमराव पाटील) मला आडवले. ते स्वतःच आजोबांकडे गेले. थोड्या वेळानी आजोबांना सोबत घेऊन आमच्यासमोर आले. मास्तरानी आजोबांना आमच्यासमोर बोलते केले. तेव्हा आजोबा म्हणाले, बाळांनो माझ्या डोळ्यात आनंदाश्रु आहेत. माझ्या वडिलांनी मला पैलवान होताना पाहिले. मी माझ्या मुलाला (आमदार महेश लांडगे यांच्या वडिलांना) पैलवान झालेलं पाहिलं. आता माझा नातू महेशला पैलवान होताना मी पाहतोय. याचाच आनंद मावेनासा झालाय म्हणून डोळ्यातून आनंदाश्रु ढळत आहेत…. ही आठवण सांगत आमदार लांडगे पुढे म्हणाले की, “माझे आजोबा हे पट्टीचे पैलवान होते. त्यांनी ध्येय आणि चिकाटी बाळगून त्यांच्या क्षेत्रात उत्तम करिअर केले, तेव्हापासून मलाही कुस्ती आणि पैलवानकीचे वेड जडले आणि तेच ध्येय मनाशी बाळगून एक चांगला पैलवान होण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हापासून मला पैलवान महेश लांडगे म्हंटलेले फार आवडते.
167 विद्यार्थ्यांचा सन्मान
दत्तनगर, विद्यानगर, काळभोर नगर, अजंठा नगर, पांढरकर वस्ती या प्रभाग क्रमांक – २० मध्ये नुकताच विदयार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. कार्यक्रमाला दत्तनगर, विद्यानगर परिसरातील वर्ल्ड बुक ऑफ इंडिया रेकॉर्डसाठी दानपट्टा, तलवार बाजी या खेळातील विशेष प्राधान्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नुकतेच पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रीय पुरस्कारासाठी अभिनय क्षेत्रात निवड झालेल्या आकांक्षा पिंगळे हिचा ” सुमी ” चित्रपटासाठी उत्कृष्ट बालकलाकार म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमात १६७ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. इयत्ता दहावी मध्ये छाया मोरे व ओम मोरे या आई व मुलाने एकाच वेळी अनुक्रमे ७४% व ७६% गुण मिळवून पास झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेश लांडगे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे, किरण भोसले, माजी नगरसेवक राजू दुर्गे, संजय शिरसाळकर, नंदा करे आदी उपस्थित होते. नॉव्हेल्स एन आय बी. आर. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य वैभव फंड म्हणाले, इयत्ता १० वी आणि १२ वी नंतर पारंपारिक अभ्यासक्रमांकडे न वळता अपारंपारिक अभ्यासक्रमांचाही विचार करावा. हॉटेल मॕनेजमेंट हा पूर्णतः वेगळ्या वाटेवर नेणारा अभ्यासक्रम आहे. तो निवडून विद्यार्थी कशाप्रकारे आपले शैक्षणिक करिअर घडवून विदेशात नोकरीची संधी मिळवतात, याचा आपण विचार केला पाहिजे.]

प्रा. वैभव फंड यांनी सचिन तेंडूलकरचा एक छोटासा किस्सा सांगून मोठी माणसं कशी घडतात याचं उत्कृष्ट उदाहरण विद्यार्थ्यांसमोर मांडलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन माजी नगरसेविका अनुराधा गोरखे व अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले.