जलतरण तलावात पाहण्यासाठी किचकट अटी, सर्वसामान्यांना डावलण्याचा प्रयत्न
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वडमुखवाडीतील जलतरण तलावात पोहण्यासाठी क्रीडा विभागाने ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया लागू केली आहे. नागरिकांना संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे खाते खोलावे लागणार आहे. त्यामध्ये नावनोंदणी करुन तलावाची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि अल्पशिक्षित नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वडमुखवाडीतील संत ज्ञानेश्वर जलतरण तलाव शनिवारी (दि. 1) नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. मात्र, त्यामध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी ऑनलाइन बॅचेस सुरू केल्या जाणार आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी बॅचची निवड करावी लागणार आहे. हे जलतरण तलावात शुक्रवार वगळता दररोज निर्धारित वेळेनुसार बॅचेस भरविण्यात येणार आहेत. पहिली बॅच सकाळी सहा ते पावणे सात यावेळेत सुरू होणार आहे. त्यामध्ये केवळ पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. दुसरी बॅच सकाळी सात ते पावनेआठ, तिसरी बॅच आठ ते पावनेनऊ यावेळेत भरवली जाणार आहे. या दोन्ही बॅचेस सर्वांसाठी खुल्या राहणार आहेत. तर, तिसरी बॅच सकाळी नऊ ते पावनेदहा या वेळेत भरणार आहे. ही बॅच केवळ महिलांसाठी राहणार आहे. महिलांसाठीची दुसरी बॅच दुपारी दोन ते सव्वातीन यावेळेत भरवली जाणार आहे. तीन ते सव्वाचार, साडेचार ते सव्वापाच आणि साडेपाच ते सव्वासह या तिन्ही बॅचेस सर्वांसाठी खुल्या राहणार आहेत.
सकाळच्या मुख्य वेळेत नागरिकांना किचकट अटी घालण्यात आल्या आहेत. बॅचमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर जलतरण तलावाच्या लिंकवर जाऊन नावनोंदणी करावयाची आहे. नागरिकाने आपले खाते तयार करावयाचे आहे. नागरिकांना जास्तीत जास्त तीन सदस्यांची नोंद करता येणार आहे. ऑनलाइन पेमेंट भरावे लागणार आहे. त्यानंतर येणारा सिरीयल क्रमांक संबंधित कर्मचाऱ्याला सांगून आपली नोंद प्रमाणित करावी लागणार आहे. जलतरणासाठी येताना आधार कार्डची प्रत सोबत आणणे बंधनकारक असणार आहे. अटी शर्ती तयार करताना केवळ विशिष्ट वर्गाचा विचार केला असून सर्वसामान्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.