कोरोनाचे नियम पाळून दिवाळी उत्साहात साजरी करा – आमदार महेश लांडगे

पिंपरी | प्रतिनिधी

मांगल्याचे प्रतिक म्हणून दिवाळी संपुर्ण देशभर उत्साहात साजरी करण्यात येते. मागील दोन वर्ष कोरोनामुळे नागरिकांना दिवाळी साजरी करता आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने देशभर मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. सर्व नागरिकांनी उत्साहाने यात सहभागी व्हावे. परंतू कोरोनाचे नियम आणि स्वच्छता पाळावी असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केले.

स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दिवाळीनिमित्त दिवाळी शॉपिंग फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्‌घाटन गुरुवारी (दि. 28 ऑक्टोबर) आ. महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. नितीन लांडगे, ज्येष्ठ नगरसेविका भीमाताई फुगे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा सोनाली गव्हाणे, नगरसेवक विकास डोळस, सागर गवळी, सामाजिक कार्यकर्ते विजय फुगे, निवृत्ती फुगे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ समन्वयक अर्चना क्षिरसागर, क्षेत्रिय समन्वयक सुजाता परदेशी तसेच सुदर्शना पाटील, पल्लवी गुळवे, अहिल्या साळुंखे, निशा निमसे, जयश्री ढोले आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मिशन स्वावलंबन प्रकल्पातील भोसरीतील 33 बचत गटांसाठी दिवाळीनिमित्त स्टॉल उभारण्यात आले आहेत. या फेस्टिवलमध्ये दिवाळीनिमित्त लागणारे सर्व साहित्य तसेच बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध आकर्षक वस्तूंना बाजारपेठ मिळून देण्याच्या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात फॅशन वेअर, ज्वेलरी, पॅक फुड, मसाले, पापड, लोणची, बॅग्स, गिफ्ट आर्टिकल्स, दिवाळीसाठी लागणारे आकर्षक पणत्या, आकाश कंदिल, मातीची भांडी, दिवाळी फराळ आदीं वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केले आहे.

यावेळी ॲड. नितीन लांडगे म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध प्रकल्प आणि योजना राबवित असते. यामध्ये महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दिवाळी फेस्टिवलचे आयोजन केले आहे. आता महिला बचत गटांनी देखिल पारंपारिक व्यवसायांऐवजी नविन आणि आधुनिक उद्योग कौशल्य मिळवून त्यातून आर्थिक विकास साध्य करावा. एखाद्या कुटूंबातील महिला आर्थिक सक्षम झाली तर पुर्ण कुटूंब सक्षम होईल. तसेच त्यांचा आर्थिकस्तर देखिल उंचावेल. महिला सक्षमीकरणासाठी महानगरापालिकेच्या वतीने सुरु असणा-या विविध योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा असेही आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केले.

Share to