खासगी शाळेला आरटीईचा २५ टक्के आरक्षणाचा नियम लागू नाही, शिक्षणाधिकारी यांचा दावा
- पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील खासगी शाळा चालकांच्या शंकांचे निरसन..
- ‘महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळा’च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शिक्षणाधिकाऱ्यांची भेट…
पिंपरी (दि. २३ मार्च २०२४) :- एखाद्या खासगी विनाअनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय अथवा अनुदानित शाळा असल्यास त्या ठिकाणी खासगी शाळेला आरटीईचा २५ टक्के आरक्षणाचा नियम लागू होत नाही, अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळ’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच त्यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
खासगी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच त्यांना विविध मागण्यांचे पत्रही देण्यात आले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा जागृती धर्माधिकारी, शरदचंद्र धारूरकर, महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संदीप काटे, खासगी शिक्षण संस्थांचे अध्यक्ष अशोक मुरकुटे, अंकुश बोडके, प्राचार्या सरला गाडे आणि शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांची उपस्थिती होती.
संस्थेच्या उपाध्यक्षा जागृती धर्माधिकारी म्हणाल्या, कोरोना काळामध्ये शाळांना आरटीई २५ टक्केचा निधी अल्प प्रमाणात मिळाला आहे. त्यामुळे आज शासनाकडे सुमारे बाराशे कोटीच्यावर रक्कम थकीत आहे. हा निधी तसेच २०२३ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील २०० कोटीपैकी उर्वरित १६० कोटी रुपये निधी पडून आहे. हा निधी शाळांना वितरित करण्यासाठी तसेच प्रति विद्यार्थी शुल्क प्रतिपूर्ती (Fee Reimbursement) रकमेत वाढ करावी, यासाठी राज्याच्या शिक्षण खात्याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रशासकीय पाठपुरावा करावा.
शहराध्यक्ष संदीप काटे माहिती देताना म्हणाले, आरटीई’तील नवीन अधिसूचनेबाबत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील खासगी विनाअनुदानित शाळा चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत स्पष्टता यावी याकरिता शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांची भेट घेतली. यापुढे विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर महापालिकेची, शासकीय किंवा अनुदानित शाळा नसेल त्याच ठिकाणी खासगी विनाअनुदानित शिक्षण संस्थेत आरटीई कोट्यातून मुलांना प्रवेश दिला जाईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले आहे, असे काटे म्हणाले.