स्टॉर्म वॉटर लाईन नसल्यामुळे पिंपळे सौदागर येथील बीआरटी रोड ते क्रिस्टल हॉटेल रस्त्याला नदीचे स्वरुप

  • ड क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांच्या गलथाम कारभाराचा फटका..
  • गुडघाभर पाण्यातून वावरताना नागरिकांची होतेय तारांबळ…

पिंपरी (दि. २५ जुलै २०२४) :- शहरात पावसाचा हाहाकार सुरु असून पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या हद्दीतून येणा-या पाण्यामुळे बीआरटी रोड ते क्रिस्टल हॉटेल रस्त्याला नदीचे स्वरुप आले आहे. पाण्याचा निचरा होण्यास रस्त्याच्या दोन्ही बाजुला स्टॉर्म वॉटर लाईन टाकली नसल्यामुळे रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरात घुसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वावरावे लागत आहे.

बीआरटी रस्ता ते क्रिस्टल हॉटेल १८ मीटरचा रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निविदा राबविण्यात आली. त्यासाठी लागणारी भारतीय लष्कराची जागा देण्यास लष्कर प्रशासनाने हिरवा कंदील दिला असून त्या बदल्यात काही कामे करुन देण्याची अट लष्कर प्रशासनाने महापालिकेला घातलेली आहे. त्यातील कामे करुन देण्यास महापालिकेच्या नगररचना आणि स्थापत्य विभागाकडून चालढकल केली जात आहे.

लष्कराने रस्त्यासाठी लागणारी जागा ताब्यात देण्याची तयारी दाखवलेली असताना देखील पालिकेकडून शिघ्र गतीने पाऊले उचलली जात नाहीत. अधिका-यांच्या वेळकाढूपणामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून हे काम रखडले आहे. लष्कर आणि स्थानिक नागरिक यांच्यात समन्वय साधून येथील नागरिकांना रस्ता, ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर लाईन सुविधा निर्माण करुन देण्यात महापालिकेचे अधिकारी अपयशी ठरले आहेत. परिणामी, पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. हे पाहून तरी अधिका-यांना जाग येईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लष्कर हद्दीला लागून असलेल्या हॉटेल क्रिस्टल समोरील रस्त्याचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. त्यामध्ये स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन, रस्ता रुंदीकरण या कामाचा त्यामध्ये समावेश आहे. पावसाळा संपल्यानंतर ही कामे मार्गी लावली जातील. आज पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी कायमस्वरूपी पर्याय सोय उपलब्ध होईल.
– सुनिल नरोटे, उपअभियंता – ड क्षेत्रीय स्थापत्य विभाग…

Share to