पिंपळे निलख येथील साहिल हाईट्स सोसायटीमध्ये वृक्षतोड
- सोसायटी अध्यक्ष, खजिनदारावर कारवाईची मागणी
पिंपळे निलख (दि. ०१ ऑगस्ट २०२४) :- पिंपळे निलख येथील साहिल हाईट्स सोसायटीमधील झाडे तोडली जात आहेत. अध्यक्ष विक्रांत बनसोडे आणि खजिनदार सचिन भंडारी यांना वेळोवेळी विनंती करुन देखील त्यांच्याकडून वृक्षतोड थांबवली जात नाही. त्यामुळे बनसोडे आणि भंडारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे केली आहे.
यासंदर्भात रहिवाशांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाला निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे की, एकीकडे महापालिका पर्यावरणाचे संतुलन नियंत्रित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करण्यास प्रोत्साहन देत आहे. तर, दुसरीकडे उच्चशिक्षित रहिवाशांकडून सोसायटीच्या आवारातील उच्च प्रतिची झाडे तोडली जात आहेत. महापालिका प्रशासन पर्यावरण संवर्धनाला चालना देत असताना सोसायटीधारकांकडून पर्यावरणाचा -हास केला जात असल्याने आवाक होण्याची वेळ आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पिंपळे निलख येथे साहिल हाईट्स सोसायटीची रचना करताना भविष्यातील पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी सोसायटीच्या आवारात उच्च प्रतिचा ऑक्सिजन देणारी झाडे लावण्यात आली होती. परंतु, अलिकडे सोसायटीच्या पदाधिका-यांकडून या सुदृढ झाडांवर कु-हाड चालवण्यात आली आहे. साहिल हाईट्स सोसायटीतील असंख्य झाडे तोडली आहेत.
वृक्षतोडीबाबत सोसायटीचे अध्यक्ष विक्रांत बनसोडे आणि खजिनदार सचिन भंडारी यांना वेळोवेळी विनंती करण्यात आली. तरी देखील ते आपल्या मानसिकतेत बदल करण्याची तयारी दाखवत नाहीत. त्यांच्याकडून सोसायटीच्या आवारातील बेसुमार वृक्षतोड केली जात असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांच्याकडे केली आहे.
”साहिल हाईट्स सोसायटीतील वृक्षतोडीचा नुकताच पंचनामा केला. त्याचा सविस्तर अहवाल उद्यान विभागाचे मुख्य अधिकारी यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे. वृक्षतोड करणा-या संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे ”.
– अनिल गायकवाड, उद्यान सहायक, ड क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका…