शाहू, फुले श्रृष्टीच्या भूमिपूजनाला राष्ट्रवादीचा विरोध, भाजपाने राजकारण करू नये
पिंपरी | महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील संभाजीनगर, चिंचवड येथील शाहू सृष्टी हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात मान्यता मिळालेल्या शहरातील महत्वाकांशी प्रकल्पापैकी हे एक प्रकल्प आहे. सन २०१६ रोजी शाहू सृष्टीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. पुन्हा त्याच कामाचे नव्याने भूमीपूजन करण्याचा घाट भाजपाने घातला आहे. त्याला आमचा तिव्र विरोध आहे, असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
सुमारे १ कोटी ८० लाखाचे काम सुरु असून दुस-या टप्प्यातील कामांसाठी सुमारे ७ कोटी ४६ लाख मंजूर करण्यात आले आहेत. शाहूसृष्टी व फुले सृष्टीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते करण्याचे नियोजन सत्ताधारी भाजप पक्षामार्फत करण्यात येत आहे. सदर भूमिपूजनांच्या निमत्रंण पत्रिकेत अजित पवार यांचे नाव टाकण्यात आले आहे. परंतु, आजपर्यंत पालकमंत्र्यांना रितसर निमत्रंण दिले गेले नाही. अथवा निमत्रंण पत्रिका पाठविण्यात आलेली नाही. किंवा बोलणे झाले नाही, असे वाघेर म्हणाले.
एकाद्या प्रकल्पाचे रितसर भूमिपूजन झाले असता केवळ श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी भाजप परत संभाजी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे नियोजन करीत आहे. मागील चार वर्षात नाव घेण्यासारखे एकतरी काम भाजपने केले आहे काय ? राष्ट्रवादी कॉग्रेसने मंजूर केलेले प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांचे उद्घघाटने करुन फक्त त्या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचे काम भाजप करत आहे. आता महापालिकेच्या निवडणूका आल्या म्हणून आम्ही शहरातील नागरीकांसाठी काम करतोय हे दाखवून देण्याचा खटोटोप चालू आहे. परंतु, शहरातील जनता आता सर्व जाणून आहे. मागील चार साडेचार वर्षात काय दिवे लावले ते ओळखून आहे. शाहू सृष्टी हा प्रकल्प राष्ट्रवादी कॉग्रेसने सत्ता असताना मंजूर करुन त्याचे कामही चालू केले होते. याउलट मागील चार वर्षात या प्रकल्पाची काहीच प्रगती झाली नाही आता निवडणूकांच्या तोडांवर या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा घाट घातला जात आहे.
या भूमिपूजनासाठी पालकमंत्र्याना निमंत्रण न देता निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले आहे, हे सर्वथा चुकीचे आहे. याचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामार्फत आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच, सदर प्रकल्पाचे भूमिपूजन २०१६ रोजी अजित पवार यांच्या हस्ते झाल्याने या भूमिपूजनास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा तीव्र विरोध राहिल. शाहू, फुले आंबेडकर महाराष्ट्राची दैवते आहेत, याबाबत तरी भाजपने राजकारण करु नये, असा इशारा वाघेरे यांनी दिला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम उपस्थित होते.