शहरातील इनडोअर जीममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य खरेदी करावे – आमदार लक्ष्मण जगताप
पिंपरी | महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका क्रिडा विभागाच्या वतीने विविध व्यायामशाळांकरिता इन डोअर जिम साहित्य हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व उच्च प्रतीचे खरेदी करण्यात यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार जगताप यांनी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना प्रादुर्भाव कालावधीतील लॉकडाऊन दरम्यान शहरातील सगळ्या व्यायामशाळा बंद असतानाही पिंपरी-चिंचवड मनपाच्या क्रिडा विभागास शहरातील व्यायामशाळाकरिता आवश्यक इन डोअर साहित्य खरेदीकरणेबाबत पिंपरी-चिंचवड मनपाच्या भांडार विभागमार्फत विविध १९ प्रकारच्या क्रीडा साहित्य करिता अंदाजपत्रक दर मागविले जात आहेत. पिंपरी-चिंचवड मध्यवर्ती भांडार विभागामार्फत सन २०१९ -२० मधील ई-निविदा सुचना क्र.२० नुसार पिंपरी-चिंचवड म.न.पा.च्या व्यायामशाळा अद्यावत करण्यात आल्या आहेत.
मनपातील काही अधिकारी ठेकेदारांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे कोणत्याही कंपनीचे ट्रेड मार्क नसणारे व्यायामशाळा साहित्य उत्पादक नसणाऱ्या पुरवठाधारकांकडून व्यायामशाळा साहित्य खरेदी करून पुरविण्याचा घाट घालत असल्याचे दिसून येते. तसेच क्रीडा विभागाच्या वतीने व्यायामशाळा अद्यावत करण्यासाठी निवड करतांना व्यायामशाळेची जागा आणि तिथे किती साहित्य बसवता येतील याचा आढावा घेऊन निविदा काढल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत होईल व साहित्य मनपाच्या मध्यवर्ती भांडार विभागात धूळ खात पडून राहणार नाही याची दक्षता घेतल्यास महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होईल.
पिंपरी-चिंचवड मनपा मार्फत काढण्यात येणाऱ्या कोटेशन नोटीस सूचना क्र. १२५/२०२१-२२ अटी शर्तीमध्ये विविध व्यायामशाळांकरिता इन डोअर जिम साहित्य खरेदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व उच्च प्रतीचे करणेबाबत योग्य ते बदल करण्याकरिता संबंधितांना योग्य त्या कार्यवाहीचे आदेश निर्गमित करणेबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मा.आयुक्त पिं.चिं.मनपा यांना लेखी पत्राद्वारे सुचविले आहे.