मोशीतील प्रस्तावित न्यायालय इमारत उभारण्यासाठी 16 कोटींचा निधी मंजूर

पिंपरी (प्रतिनिधी) – मोशी येथील प्रस्तावित न्यायालयाच्या इमारत उभारणीसाठी महापालिका सर्वसाधारण सभेत १६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे न्यायालय उभारणीच्या कामाला गती मिळणार असून, शहरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित होता. सर्वसाधारण सभेने आता निधीला मंजुरी दिल्यामुळे शहरातील विधितज्ज्ञ आणि नागरिकांडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. मोशी येथील नियोजित न्यायालयीन संकुलाच्या बांधकामासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच, संपूर्ण न्यायालयाच्या बांधकामाचा खर्च पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्याच्या उपसूचनेला मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे तसेच माजी अध्यक्ष सुभाष चिंचवडे, माजी अध्यक्ष संजय दातीर पाटील, माजी अध्यक्ष दिनकर बारणे, पिंपरी-चिंचवड, मावळ, खेड नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अतीश लांडगे, विद्यमान कार्यकारिणीचे उपाध्यक्ष ॲड. गौरव वांळुज, सचिव ॲड. निखिल बोडके, महिला सचिव ॲड. प्रियांका सुरवसे, सहसचिव ॲड. सुनील रानवडे, खजिनदार ॲड. अनील पवार, हिशेब तपासनीस ॲड. गोरख मकासरे आणि सदस्य ॲड. संतोषी काळभोर, ॲड. स्नेहा कांबळे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. महेश मासुळकर, ॲड. सारिका मोरे, ॲड. ऐश्वर्या सिरसाठ यांनी पाठपुरावा केला आहे.

Share to