मालमत्ता नामकरणाची नियमावली महापालिका आयुक्तांनी केली जाहीर

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत रस्ते, चौक व सार्वजनिक मालमत्तांना दिलेल्या नावांमध्ये बदल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका मालमत्तांच्या नामकरणाची नियमावली पालिका प्रशासनाने तयार केली आहे. त्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

क्षेत्रीय समिती अथवा महापालिका ठरावाने दिलेल्या नावांमध्ये बदल करू नये. क्रीडा, वैद्यकीय शिक्षणविषयक वास्तूंना त्या-त्या क्षेत्रात योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त केलेल्यांची नावे द्यावीत. महापालिकेने विकसित केलेले सांस्कृतिक भवन, नाट्यगृह, कलादालन तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अशा इतर वास्तूंना त्या-त्या क्षेत्रांशी संबंधितांची नावे द्यावीत. शहरातील रस्ते, चौक, पूल, बसथांबे यांना राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक सेवा केलेल्या व्यक्ती, महापुरुष, साधू, संत, राजे महाराजे यांची नावे द्यावीत. पण, एकच नाव दोन ठिकाणी नसावे. त्यामुळे पत्ता शोधण्यात अडचण निर्माण होणार नाही.

मंडई, व्यापारी संकुल, अंतर्गत रस्ते, चौक यांना सामाजिक कार्यात योगदान असलेल्या व्यक्तींचे नाव द्यावे. कोणत्याही मालमत्तांचे धार्मिक, जातीय तेढ निर्माण होईल असे नामकरण करण्यात येऊ नये. एखाद्या गावात राष्ट्रीय खेळाडू नसल्यास स्थानिक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांचीही शिफारस येईल. ज्यांनी कोणत्याही प्रकल्पास विनामोबदला जागा दिली असल्यास त्यांच्या सूचना अथवा मागणीप्रमाणे प्रकल्पाच्या नावाबाबत विचार करता येईल, अशी नियमावली प्रशासनाने तयार केली आहे.

Share to