‘ओबीसींवर विश्वास नाही’ म्हणारे आव्हाड यांच्यावर पडळकरांचा निशाना… म्हणाले ‘सर्व प्रश्न अनुत्तरीत ठेवून मंत्री शिळोप्याच्या गप्पा मारतायत’
पुणे – क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण झालाय. आव्हाड यांनी या कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाना साधला आहे. प्रस्थापितांना खूष करण्यासाठी आव्हाड हे कंत्राटी कामगार असल्याचा टोला पडळकरांनी लगावला आहे.
आव्हाड यांच्या भाषणाचा ५१ सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,” असं आव्हाड या व्हिडीओत म्हणतात. या विधानावरून भाजपाने त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यात पडळकरांनी त्यांच्यावर जबरदस्त आरोप केले आहेत.
ओबीसींवरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल,” असं आव्हाड म्हणाले आहेत.
आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वतःला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला?, असा प्रश्न पडळकर यांनी आव्हाड यांना विचारलाय. वेळ पडली तर प्रशासक नेमू, म्हणजे आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच त्यांचा हेतू आहे, असंही पडळकर म्हणालेत.
आत्ताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहीती नाही. राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत, अशा शब्दांमध्ये पडळकरांनी अजित पवार आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.