विद्युत समस्यांबाबत महावितरण अधिका-यांसोबत आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली तातडीची बैठक
- खंडीत वीज पुरवठ्याबाबत महावितरणच्या अधिका-यांना दिल्या सक्त सूचना
- नगरसेवक, कार्यकर्त्यांनी मांडल्या आपापल्या भागात भेडसावणा-या समस्या
पिंपरी (प्रतिनिधी) – नागरिकांना भेडसावणाऱ्या विद्युतविषय समस्यांचे निराकरण करण्यात यावे. दापोडी व बोपखेलसाठी वेगवेगळा स्टाफ असावा, जेणेकरून त्या त्या भागातील समस्यांचे निराकरण तात्काळ होईल. पुढील आठवड्यात दापोडी, पिंपरी, गांधीनगर, आकुर्डी, दत्तवाडी या भागातील सर्व डीपी बॉक्स, विद्युत तारांची पाहणी करून उपाययोजना करावी, अशा सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी महावितरणच्या अधिका-यांना बैठकीत केल्या.
आमदार अण्णा बनसोडे यांनी शहरातील नागरिकांच्या विद्युतविषयक समस्यांबाबत महावितरणच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपआपल्या भागातील विद्युत विषयक समस्यांचा पाढा वाचला. माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिपरी विभागातील उघड्या डी.पी. बॉक्सची समस्या मांडली. पिंपरीमध्ये होणाऱ्या वीज चोरी होत असल्याकडे लक्ष वेधले. यानंतर दापोडीच्या नगरसेविका माई काटे यांनी दापोडी परिसरात अंडर ग्राऊंड केबलींग करणेबाबत निवेदन दले. आकुर्डी व दत्तवाडी परिसरामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण तातडीने होत नसल्याचे इखलास सय्यद यांनी निदर्शनास आणून दिले. विद्युत समिती सदस्य हिरालाल जाधव यांनी गांधीनगर भागातील अनियमित पणे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले. तसेच, दर पंधरा ते वीस दिवसांनी मेन सप्लायची संपूर्ण वायर जळून जात असल्याने त्यानंतर पूर्ण २ दिवस गांधीनगर अंधारात जात असल्याचीही बाब निदर्शनास आणून दिली.
बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता सतीश राजदीप, भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, निगडी प्राधिकरणाचे सहायक कार्यकारी अभियंता झोडगे, आकुर्डीचे कार्यकारी अभियंता कवडे, चिंचवडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्या भोसले मॅडम, चिंचवडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जाधव, पिंपरीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चाकूरकर, प्राधिकरण सब डिव्हिजनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चौधरी, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका माई काटे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, आशा शिंदे, इखलास सय्यद, गंगाताई धेंडे, हिरालाल जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.