भोसरीत सर्व्हे नंबर 1 मध्ये भाजी मंडई, बहुउद्देशीय सभागृह आणि पार्किंगसह तीन मजली इमारतीचे भूमीपूजन

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे भोसरीतील सर्व्हे क्रमांक १ मध्ये सुसज्ज भाजी मंडई, बहुउद्देशीय सभागृह आणि पार्किंग विकसित करण्याच्या कामाला अखेर मूर्तस्वरूप आले आहे. याठिकाणी तळमजल्यासह तीन मजली इमारत उभारण्याच्या कामाचे महापौर माई ढोरे यांच्या हस्ते बुधवारी (दि. २६) भूमीपूजन करण्यात आले.

महापालिकेच्या विकास आराखड्यात भोसरी येथील सर्व्हे क्रमांक १, आरक्षण क्रमांक ४३२ मधील १ एकर जागेवर मार्केटचे आरक्षण आहे. या आरक्षणाच्या विकासाकडे आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले होते. रवि लांडगे हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी या आरक्षणाच्या जागेत मार्केट उभारण्यात यावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी ते प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत होते. २०१९ पासून त्यांनी प्रशासनासोबत अनेकदा पत्रव्यवहार देखील केला आहे.

नगरसेवक रवि लांडगे यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, महापालिकेने भोसरीतील सर्व्हे क्रमांक १ मध्ये भाजी मंडई, बहुउद्देशीय सभागृह आणि पार्किंग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व्हे क्रमांक १ मधील आरक्षण क्रमांक ४३२ च्या सुमारे २ हजार ६९७ जागेवर भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंग आणि भाजी मंडईचे २१ गाळे, पहिल्या मजल्यावर पार्किंग आणि १७ व्यावसायिक गाळे, दुसऱ्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह आणि तिसऱ्या मजल्यावर सुद्धा बहुउद्देशीय सभागृह असणार आहे. ही इमारत उभारण्याच्या कामाचे महापौर माई ढोरे यांच्या हस्ते बुधवारी भूमीपूजन करण्यात आले.

Share to