ऑफलाईन परिक्षा घेण्यास विद्यार्थ्यांचा विरोध, निगडीमध्ये 200 विद्यार्थी उतरले रस्त्यावर

पिंपरी (प्रतिनिधी) – शाळा व महाविद्यालये ऑफलाईन परिक्षा घेण्याची तयारी करत असल्याच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून निगडीत दोन ठिकाणी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे.

डी वाय पाटील, पीसीईटी, म्हाळसाकांत या शाळा महाविद्यालयातील सुमारे 150 ते 200 विद्यार्थी आज (सोमवारी, दि. 31) सकाळी रस्त्यावर उतरले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्षात न शिकवता त्यांचा सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवण्यात आला. आता शाळा, महाविद्यालये ऑफलाईन परीक्षा घेण्याची तयारी करीत आहेत. सुमारे 90 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन झालेला असताना परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल विचारत विद्यार्थी रस्त्यावर आले.

निगडी येथील पवळे उड्डाणपुलाखालील चौकात काही विद्यार्थी जमा झाले. तिथे त्यांनी शाळा प्रशासनाचा निषेध केला. हे आंदोलन विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर ऑनलाईन पाहिले. त्यानंतर आणखी विद्यार्थी जमा झाले. पवळे उड्डाणपुलाखाली आंदोलन केल्यानंतर मुलांनी एलआयसी चौक, निगडी येथे देखील आंदोलन केले. दरम्यान, निगडी पोलीस आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी मुलांना समजावले. त्यावेळी पोलिसांनी मुलांना मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. मात्र याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. काही वेळानंतर मुले पांगली.

Share to