मावळ लोकसभेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

पिंपरी (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार तथा हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर यांचे आज (बुधवारी) निधन झाले. त्यांचे वय 79 होते. उद्या (दि. 3) सकाळी अकरा वाजता निगडी येथील स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाकड ते निगडी स्मशानभूमी दरम्यान त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

बाबर मूळचे सातारा जिल्ह्यातील वाई येथील होते. पिंपरी-चिंचवड शहरात ते स्थायिक झाले होते. रेशन फेडरेशनचे ते अध्यक्ष होते. काळभोरनगर भागातून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग दोनवेळा विधिमंडळात प्रतिनिधित्व केले.

मावळ लोकसभा मतदारसंघाची 2009 मध्ये नव्याने निर्मिती झाली. त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आझम पानसरे यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला. खासदार म्हणून त्यांची कारकीर्द गाजली आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पिंपरी-चिंचवड, हवेली विधानसभा व मावळ लोकसभेतील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याला त्यांनी प्राधान्य दिले. शिवसेना पक्षाला साजेसं व्यक्तीमत्व असल्यामुळे जनमानसावर त्यांच्या कर्तृत्वाची कायमच छाप राहिली. त्यांच्या निधनाने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share to