‘दबावाचं राजकारण कदापी खपवून घेणार नाही’, भोसरीतील नगरसेवकांचे खुले आव्हान
- भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यावर प्रचंड नाराजी
- उजवे-डावे समजले जाणारे सर्वचजण राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर
महाईन्यूज |अमोल शित्रे
गेल्या पाच वर्षात नगरसेवकांची कोंडमारी झाल्याने शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. भोसरीतील आमदार लांडगे समर्थक दहा नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ‘दबावाचं राजकारण कदापी खपवून घेणार नाही’, असा इशारा देत नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज राजीनामा दिल्याने भोसरीच्या गडाला पहिला हादरा बसला आहे. काही दिवसांत भोसरीत भाजपाला मोठे भगदाड पडण्याची शक्यता असून आमदार लांडगे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर अनेकांना महत्वाची व प्रतिष्ठेची पदे दिली. मात्र, त्या पदावर काम करताना मुक्त स्वतंत्र्य दिले नाही. त्यामुळे अनेकांच्या इच्छा आकांक्षांना मुरड बसली. त्यामुळे नगरसेवकांच्या नाराजीचा उद्रेक होऊ पाहात आहे. आमदार महेश लांडगे यांच्यावर त्यांच्याचेच खंदे समर्थक उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. सुरूवातीला स्व. अंकुशराव लांडगे यांचे राजकीय वारसदार नगरसेवक रवी लांडगे यांनी स्थायी समितीचे सदस्य पद धुडकावले आणि संपूर्ण भोसरी विधानसभा मतदार संघात ‘माझे काय चुकले ?’ अशा आशयाचे फलक लावून आमदार लांडगे यांना खुले आव्हान दिले. त्यानंतर नगरसेवक संजय नेवाळे यांनी सुध्दा त्यांना रामराम ठेकला. तेव्हापासून लांडगे यांच्या नेतृत्वाला उतरती कळा लागल्याचे दिसते. आज लांडगे यांचे असंख्य नगरसेवक त्यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. गेल्या पाच वर्षात प्रभागातील विकासकामे आमदारांच्याच नेतृत्वाखाली झाल्याचे चित्र दाखविण्यात आले. काम होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर त्यांचेच फ्लेक्स लावण्याची वेळ आमच्यावर आली. त्यामुळे आम्ही पाच वर्षात नेमके केले काय ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत, अशी भावना भोसरीतल्या एका नगरसेवकाने पत्रकारांसमोर व्यक्त केली.
भोसरीत आजवर झालेल्या मोठमोठ्या कार्यक्रमांच्या आर्थिक खर्चात देखील आम्हालाच शेअर भरावा लागला. वाढदिवस असेल जत्रा-यात्रा, मेळावे, बैठका याचे नियोजन करता करता आमचे खिशे रिकामे झाले. परंतु, पाच वर्षात एक नया पैसा महापालिकेतून मिळाला नाही. खोट्या प्रतिष्ठेच्या दुनियेत गुरफटून ठेवून त्यांनी वारेमाप कमई केली. त्यातील एक रुपया देखील आम्हाला मिळाला नाही. मग आम्ही का पक्षात थांबायचे ? असा सवाल भाजपाचे विद्यमान नगरसेवक करू लागले आहेत. चुकीच्या कारभाराला नेत्यांकडून खुलेआम पाठिंबा मिळत असल्याने पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेतृत्वाकडे तक्रारी केल्या. तेथून सुध्दा पार्टीचा निर्णय सर्वमान्य असतो, पार्टीचे नेते म्हणतील तेच नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी ऐकायचे आहे, पार्टीच्या विरोधात जाल तर कारवाईला सामोरे जाल, असा दम दिला जातो. मग पार्टीसाठी चुकीची कामे करायची का ? असा सवाल नगरसेवक करू लागले आहेत. यात आमदार लांडगे यांचा कितपत संबंध आहे, हे सांगता येत नसले तरी त्यांना या नाराज समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवता आले नाही, हेच यावरून सिध्द होत आहे.
नगरसेवक वसंत बोराटे यांचा ना’राजीनामा !
वसंत बोराटे हे आमदार महेश लांडगे यांचे खंदे समर्थक होते. त्यांच्या निर्णयापुढे बोराटे कसलाच पर्याय शोधत नव्हते. दादा तुम्ही म्हणाल तसे, अशी सम्मती त्यांची असायची. मात्र, लांडगे आणि बोराटे यांच्यात नेमके काय झाले हे त्या दोघांनाच माहीत. काही तरी नक्कीच विपरीत घडले असावे, त्यातूनच बोराटे यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. कारण, लांडगे यांच्या विरोधात जाऊन राजीनामा घेण्याचे धाडस बोराटे करतील, असे कदापी वाटत नव्हते. परंतु, त्यांनी मोशी-जाधववाडीच्या विकासासाठी कुणाच्या दबावाचं राजकारण कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा देत सर्वात आधी राजीनामा दिला आहे.
वारं फिरलय.. आमचं ठरलंय !
काही नगरसेवकांनी ‘वारं फिरलंय.. आमचं ठरलंय’ असा इशारा देत सोशल मीडियावर पोस्टरबाजी सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक असलेल्या अश्विनी जाधव यांनी अशी पोस्ट टाकून आगामी काळातील त्यांची राजकीय भूमिका बदलल्याचे दाखवून दिले आहे. असे असंख्य नगरसेवक सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करीत भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार लांडगे यांच्या गडाला मोठे खिंडार पडण्याचे संकेत मिळत आहेत.