भाजपाने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्यामुळेच चिंचवडमध्ये निकृष्ट दर्जाची कामे

  • निकृष्ट दर्जाच्या विकास कामांवरून शिवसेना वेताळनगर शाखेच्या वतीने आंदोलन
  • शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांचा सत्ताधारी भाजपावर घणाघात

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवडगावातील चापेकर चौकात केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना अडथळे निर्माण झाले आहेत. रहदारीच्या रस्त्यावर जागेजागी गतीरोधक केल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार आणि भाजपा पदाधिका-यांनी संगणमत करून विकासकामाचे कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत, अशा शब्दांत शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी सत्ताधारी भाजपाचा निषेध केला.

चिंचवडमधील चापेकर चौकात शिवसेना वेतळनगर शाखेच्या वतीने आज सत्ताधारी भाजपाच्या निषेधार्त तिव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले आणि शहर संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे,शहर संघटक संतोष सौंदणकर यांच्यासह चिंचवड विधानसभा युवाअधिकारी माऊली जगताप, महेश कलाल, उमेश पाटील, गुजरात खान, विभागप्रमुख श्रीमंत गिरी, नितीन पाटील, शिवाजी पाटील, संदीप भालके, मजिद शेख, भरत साळुंखे, पंकज दिक्षीत, सम्राट चांदणे, लिलाधर वाणी, रफीक बेग, हेमचंद्र जावळे, राजू रंधावणे आदींचा आंदोलनात सहभाग होता.

शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले म्हणाले की, गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भाजपाने केवळ नागरिकांच्या पैशांची लूट केली आहे. विकासकामे काढायची, ठेकेदारांसोबत स्लिपींग पार्टनर्शिप घ्यायची. ठेकेदारांच्या आडून भाजपाच्या स्थानिक पदाधिका-यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळेच शहरात निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. नागरिकांची बाजू घेऊन जाब विचारल्यास ठेकेदाराला वाचवण्यासाठी भाजपाचे नगरसेवक त्याची बाजू घेऊन त्याला एकप्रकारे संरक्षण देतात. त्यामुळे गेल्या पाच वर्षात भाजपाने नागरिकांनी कररुपाने भरलेले कोट्यवधी रुपये खाल्ले आहेत. आता आगामी महापालिका निवडणुकीत नागरिकच भाजपाला घरचा रस्ता दाखवतील, असा इशाराही भोसले यांनी दिला.

चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे म्हणाले की, चिंचवडमधील चापेकर चौकात सिमेंट कॉंक्रिटी रस्त्याचे काम सुरू आहे. साडेतीन वर्षापूर्वी रस्त्याच्या कामाला सुरूवात केली. पालिकेतील सत्तेचे अधिकार संपत आले तरी देखील हा रस्ता पूर्णपणे विकसित झालेला नाही. तसेच, याठिकाणी उड्डाणपुलाच्या पीलरवरती छत्रपती शिवाजी महाराज, मॉंसाहेब जिजाऊ यांचे म्युरल्स लावण्यात आले आहेत. स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज यांचा पराक्रमाचे महत्व अधोरेखीत करून हे म्युरल्स करायला हवे होते. म्युरल्सचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच, चिंचवडमध्ये प्रत्येक रस्त्यांवर गतीरोधक तयार केले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गरज नसलेल्या ठिकाणी सुध्दा गतीरोधक तयार केले आहेत. त्यामुळे वाहतुककोंडी होत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शहर संघटक संतोष सौंदणकर म्हणाले की, भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे चिंचवडमध्ये निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. अनियोजित गतीरोधकामुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल सौंदणकर यांनी उपस्थित केला आहे.

कार्यक्रमाचे संयोजन चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे यांनी केले. शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी आभार मानले.

Share to