प्रहार जनशक्ती महापालिकेच्या सर्वच जागा लडविणार – राज्यमंत्री बच्चू कडू

पिंपरी (प्रितनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपरी, मोरवाडी येथील अपंग भवनास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. तेथील कामाचा आढावा घेतला. त्यानंतर भीमसृष्टी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रहार जनशक्ती पक्ष पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या जनसपंर्क कार्यालयास भेट दिली.

कार्यकर्त्यांची बैठक घेवून त्यांनी शहरातील पक्षाच्या बांधणीचा आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे आणि शहराध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती सर्वच जागा लढवणार आहे. उमेदवार देऊन फक्त नगरसेवक नाही तर जनतेचे प्रहार सेवक निवडून आणू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. महापालिकेतील भ्रष्टाचार वाढत आहे. अपंगांना न्याय मिळत नाही. कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. कंत्राटी कामगारांची पिळवणूक होत आहे. या बाबींकडे स्वतः लक्ष देणार आहे. त्यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांनी सजग राहून जनसेवा करावी, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

शहराध्यक्ष विनोद गायकवाड म्हणाले की, जनशक्ती पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष असून येणा-या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार देऊन ते निवडून येण्यासाठी अथक मेहनत घेणार आहे. पक्षाची मोर्चेबांधणी करून महापालिकेत प्रहारचे नगरसेवक पाठवणारच, असा निर्धारही त्यांनी केला.

यावेळी शहराध्यक्ष विनोद गायकवाड यांनी राजमंत्री बच्चू कडू यांच्याकडे अपंग बांधवांच्या कार्यासाठी मदत निधी म्हणून ५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी नंदकिशोर जगदाळे, संजय गायखे,  दत्तात्रय भोसले, अपंग क्रांतिच्या महिला अध्यक्षा संगिता जोशी, महासचिव ऋषिकेश उमाळे, प्रवीण जाधव, राहुल आखाडे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.

Share to