राष्ट्रवादीने मागविले 46 प्रभागातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन 46 प्रभागातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. सोबत कार्यअहवाल जोडण्याचे आवाहन देखील शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणात अडकल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली मंदावल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष गव्हाणे यांनी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. सोमवार ते शनिवार (दि. 12) सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात इच्छुकांनी कार्यअहवालासह अर्ज जमा करावयाचे आहेत.
आजच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल नाकारला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका की आरक्षणासह निवडणुका याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. ओबीसी आरक्षणाची वाट न पाहात इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागविण्याची घाई केल्याने मूळ ओबीसी समाजाच्या इच्छुकांसमोर पेच निर्माण झाला आहे.