मनसे अध्यक्ष राज ठाकरे 10 मार्च रोजी पिंपरी-चिंचवडच्या दौ-यावर

पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पिंपरी चिंचवड शहर दौऱ्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. १० मार्च रोजी पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गटनेते सचिन चिखले यांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शहरात आणण्याचे प्रयत्न शहरातील पदाधिकारी करत होते. मात्र, विविध कार्यक्रमांमुळे तारीख निश्चित केली जात नव्हती. दरम्यान, पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय बांधण्याच्या सूचना वरिष्ठांनी केल्या होत्या. त्यानुसार पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या समोर पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय तयार करण्यात आले आहे.

त्याचे राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्याचा आग्रह शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा होता. त्यानुसार वारंवार चर्चा करण्यात येत होत्या. प्रत्येक महिन्यात तारीख दिली जायची. मात्र, त्याला निश्चिती मिळत नव्हती. अखेर राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा मुहूर्त ठरला असून गुरुवारी (दि. 10 मार्च) सकाळी 10 वाजता पक्ष कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

Share to