माथाडी कामगार कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी – नरेंद्र पाटील
पिंपरी – पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे औद्योगिक पट्ट्यासह सातारा एमआयडीसीत बरेचशे कारखानदार माथाडी कामगार कायद्याचे उल्लंघन करतात. या विषयी वारंवार कामगार आयुक्त, माथाडी बोर्ड आणि पोलिस प्रशासनाला कळविले आहे. तरी देखिल काहीच कारवाई होत नाही. माथाडी कामगार कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (रजि.) चे सरचिटणीस आणि माजी आमदार नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांनी केली.
पिंपरी येथे बुधवारी (दि. 11 ऑगस्ट) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके, युनियनचे संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाले, माथाडी युनियन पुणे विभाग सचिव हणमंत तरडे, माथाडी युनियनचे माजी अध्यक्ष पोपटराव धोंडे, कामगार प्रतिनिधी विक्रम मोरे, अशोक साबळे, अमोल तव्हरे, उत्तम शिंदे, मंगेश घोलप, नवनाथ शेवाळे आदी उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, कायद्यातील तरतूदीनुसार काराखानदारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतू वाहतूकदारांच्या नावे नोंदणी केली जाते. यातून माथाडी कामगारांचे आर्थिक शोषण होते. यासाठी मुळ कारखानदार मालकांची नोंदणी होणे आवश्यक आहे. हे सर्व माथाडी बोर्डच्या अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले तरी कामगारांच्या टाळूवरील लोणी खाण्याची सवय असणारे अधिकारी कारवाई करीत नाहीत. यासाठी युनियनच्या वतीने बुधवारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांकडे आपण तक्रार करणार आहोत असे नरेंद्र पाटील म्हणाले. यातील बहुतांशी कारखानदार मजूरी बोर्डाकडे सुर्पूद करीत नाहीत. तर त्या ठेकेदाराकडे चुकीच्या माणसाकडे जमा करतात.
पिंपरीतील टेल्को कंपनीने माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचे मान्य केले आहे. परंतू टेल्को कंपनीचे वेन्डर, ट्रान्सपोर्टर मजूरी बोर्डाकडे भरत नाहीत. याची तपासणी टेल्कोच्या अधिका-यांनी करणे गरजेचे आहे. काही कामगार नेते माथाडी कामगारांवर दबाव आणूण राजीनामे घेतात आणि राजीनामा दिल्यानंतर मिळणारे आर्थिकलाभही त्या कामगारांना देत नाहीत याविषयीही आपण पोलिसांकडे तक्रार करणार आहोत.
हातावर ‘देवेंद्र’ नावाचा टॅटू कोरला आहे. याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र पाटील म्हणाले की, खासदारकीच्या निवडणूकीमध्ये मी साता-यातून निवडणूक लढवावी अशी इच्छा देवेंद्र फडणवीस यांची होती. परंतू जागा वाटपात हि जागा भाजपाला मिळाली नाही. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पुर्ण झाल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे उभरते, चांगले नेतृत्व आहे. भविष्यामध्ये त्यांच्याकडून चांगली कामे होणार आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम करीत आहोत.
इतर आर्थिक महामंडळांप्रमाणे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून मी त्या महामंडळाचा अध्यक्ष असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लाभधारकांना कर्ज मिळवून दिले. त्याचे व्याज महामंडळाकडून बँकेत थेट जमा करण्यात येते. यामुळे कर्जदार कर्ज घेऊन प्रत्यक्षात व्यवसाय करु लागले. यातील भ्रष्टाचार बंद झाला. हि योजना खुपच चांगली आहे. त्याचा गरजूंनी लाभा घ्यावा. या महामंडळामुळे 27 हजार मराठा समाजाचे युवक उद्योजक झाले. याचा मला आनंद वाटतो. एवढे यशस्वी महामंडळ या महाराष्ट्रात पंधरा, वीस वर्षात झाले नाही. यामध्ये एक रुपयांचाही भ्रष्टाचार नाही. कोरोनाच्या काळात सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना नऊ कोटी रुपयांचा व्याज परतावा या महामंडळाने दिला आहे. हे महामंडळ इतर महामंडळांना दिशादर्शक आहे. इतर महामंडळांनी याचे अनुकरण केल्यास ख-या गरजूंना त्याचे लाभ होतील असेही माजी आमदार नरेंद्र पाटील म्हणाले.