सील केलेल्या मिळकतधारकांचा 50 कोटींचा कर वसूल, आता दोनच दिवसांची मुदत
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून आजअखेर 538.84 कोटी मिळकत कर वसूल झाला आहे. थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कर संकलन विभागाने केले आहे.
कर भरण्यास टाळाटाळ करणा-या मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटासा पाठविण्यात येत आहेत. नोटीस देऊनही कर न भरणा-या मालमत्ताधारकांची मिळकत जप्त केली जात आहे. मिळकती जप्त झालेल्या संबंधित मालमत्ताधारकांकडून 50 कोटी 51 लाख एवढा कर वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे. तर, कर भरण्यास टाळाटाळ करणा-या तीन मालमत्ताधारकांच्या मिळकती सील केल्या आहेत. नारायण अर्जून पटेल, माधव राजाराम हुपळे आणि संजय विठ्ठल ठाकूर यांच्या मिळकती सील केल्या आहेत.
मालमत्ताधारकांना अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कराचा भरणा करण्याची नागरिकांना सुविधा दिली आहे. मनपा कराच्या शास्तीवर 70 टक्के सवलत दिली आहे. त्याची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. या सवलतीचा फायदा घेण्यासाठी दोनच दिवसांचा अवधी राहिला आहे. यापुढे अशी सवलत योजना राबविली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या सवलतीचा फायदा घ्यावा. त्यासाठी पालिकेची सर्व विभागीय करसंकलन कार्यालये 21 मार्चपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी त्वरीत मालमत्ता कर भरणा करून पाणी पुरवठा खंडीत होणे, मालमत्ता सील होणे यासारखी कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.