‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी नारेबाजी करत जनसंवाद सभेत शिवसैनिकांचा राडा
- सभा संपल्यानंतरही क्षेत्रीय अधिका-याला घातला घेराव
पिंपरी (प्रतिनिधी) – काळेवाडीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या प्रश्नांवरून ब क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत शिवसैनिकांनी राडा घातला. धरण उशाला अन् कोरड घशाला असा फलक लावून भर सभेतच प्रशासनाचा निषेध करण्यात आला. पाणी पुरठा सुरळीत करण्याची मागणी करत शिवसैनिकांसह काळेवाडीतील सर्वपक्षिय कार्यकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
काळेवाडीतील शंभुराज कॉलनी, ज्योतिबा नगर, तापकीर नगर, विजय नगर, स्वप्ननगरी कॉलनी, राजवाडे नगर आदी भागात गेल्या कित्येक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याबाबत शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते, काळेवाडी विभागप्रमुख गोरख पाटील यांनी याप्रश्नी महापालिका प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी उच्चदाबाने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, पालिका प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
त्यावर काल सोमवारी (दि. 28) ब क्षेत्रीय कार्यालयात पाण्याच्या प्रश्नावरून जनसंवाद सभेत शिवसैनिकांनी गोंधळ घातला. धरण उशाला अन् कोरड घशाला अशा आशयाचे फलक लावून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सभेत ब क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासनाचा निषेध केला. क्षेत्रीय अधिकारी मकरंद निकम यांच्याकडे उच्च दाबाचा पाणी पुरवठा करण्याची जोरदार मागणी केली. सभा संपल्यानंतर ही शिवसैनिक व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मकरंद निकम यांना घेराव घातला.
यावेळी शिवसेना काळेवाडी विभागप्रमुख गोरख पाटील, उपशहरप्रमुख हरेश नखाते, सुजाता नखाते, प्रदीप दळवी, प्रहारचे संजय गायके, अंकुश कोळेकर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.