सांगली जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने घेतली विधवांच्या पुनर्विवाहाची व पुनर्विवाहाची जबाबदारी
पुणे – सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील इनामधामणी ग्रामपंचायतीने विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देत पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याचा ठराव पारित केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडचा आदर्श समोर ठेवत जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. याचबरोबर सांगली महापालिकेच्या महासभेसमोरही हा प्रस्ताव पुढील बैठकीत घेण्यात येणार आहे.
विधवा महिलांना सौभाग्यालंकार कायम ठेवण्याचा ठराव केला जात आहे. त्यासोबतच मिरज तालुक्यातील इनामधामणी ग्रामपंचायतीने विधवा महिलांच्या पुर्नविवाहाच्या हक्काला पाठिंबा दिला आहे. याचबरोबर या महिलांना संसारोपयोगी साहित्य देऊन महिलांना पुर्नवसनासाठी मदत करण्यात येणार आहे. सरपंच आश्विनी कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसरपंच अनिता पाटील यांनी विधवांना पुर्नविवाह करण्यास सहमती देण्याचा ठराव मांडला.
या ठरावाला सदस्या राजमती मगदूम यांनी अनुमोदन दिले. पुनर्विवाह करणाऱ्या विधवा महिलांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या अनुदानासह ग्रामपंचायत स्वनिधीतून संसारोपयोगी साहित्य देणार आहे. या बैठकीला ग्रामविकास अधिकारी रविंद्र शिंदे यांच्यासह सुहास पाटील, महावीर पाटील, अमोल कोळी उपस्थित होते. विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी प्रोत्साहन देणारी इनाम धामणी पहिली ग्रामपंचायत ठरली.