आषाढी वारी पालखी सोहळ्याची जय्यत तयारी, तुकोबांच्या रथासह अब्दागिरी, जोपदार दंडाला चांदीचा मुलामा
पुणे (प्रतिनिधी) – आषाढी वारीचा 337 वा पालखी सोहळा यंदा साजरा होणार आहे. पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका, पालखी, पालखीतील आभुषणे, अब्दागिरी, चोपदाराचे दंड, गरूड टक्के, समया आणि चांदीच्या रथाला चांदीचा मुलामा (चकाकी) देण्याचे काम बुधवारी (दि. 8) सकाळी हाती घेण्यात आले.
श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा 20 जूनला प्रस्थान ठेवणार आहे. 21 जून रोजी तीर्थक्षेत्र देहूहून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सालाबाद प्रमाणे पालखी आणि रथाला चकाकी देण्यात येत आहे. सोहळ्यात असणारी आभुषणे, अब्दागिरी, चोपदाराचे दंड, गरूडटक्के, समया, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिरातील महीरप, मेघडंबरी, शेषनाग, मखर, चौकट, दरवाजे, श्रीं ची चांदीची आभुषणे, पूजेचे थाळ, तांब्याची समई, चौरंग, पाट, अभिषेकाचे पात्र यांना चकाकी देण्याचे काम करण्यात येत आहे.