भाजपाने माझ्यावर अन्याय केला तर शरद पवारांनी… म्हणत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला संताप
मुंबई – भाजपने माझ्यावर अन्याय केला परंतु शरद पवारांनी विश्वास दाखवत मला संधी दिली. एकनाथ खडसे राजकारणातून इतिहास जमा झालेत असे म्हणणाऱ्यांना आता उत्तर मिळाले, असा टिका एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एकनाथ खडसे यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे. कारम, 2014 साली भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सरकारमध्ये असतानाच झालेल्या आरोपामुळे एकनाथ खडसे यांना महसूल आणि कृषी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या प्रकरणानंतर ईडीचा फेरा त्याच्यामागे लागला.
2019 साली खडसे यांना विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले. दुसरीकडे ईडीच्या नोटीसा येणे सुरुच होते. त्यामुळेच खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार यासाठी संधी देण्यात आली आहे. मात्र, जवळपास दीड वर्ष उलटून देखील अद्याप त्याबाबत निर्णय झाला नाही. परंतु, दरम्यानच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खडसे यांनी 21 पैकी 11 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आणून बँक आपल्या ताब्यात घेतली आणि खान्देशात पक्षाची ताकद वाढवली होती.
आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आणि विधानभवनात भाजप विरोधातील एक महत्त्वाचा आवाज म्हणून एकनाथ खडसे यांना संधी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच विधानभवनात एकनाथ खडसे यांची विरोधकांवर तोफ धडाडताना पाहायला मिळेल. एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मुक्ताईनगर आणि जळगावात मोठा जल्लोष पहायला मिळत आहे.