प्रतिमा उत्कट रंग कथा २२’ प्रदर्शनात चित्र आस्वादावर संवाद

  • चित्राशी  स्वतःला जोडून घेता आले पाहिजे – अदिती जोगळेकर -हर्डीकर
  • ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाचे आयोजन

पुणे (प्रतिनिधी) – ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या( JPPAF )- कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाने  ‘ आर्टिस्ट कट्टा ‘ च्या सहकार्याने ९ ते १२ जून दरम्यान  ‘प्रतिमा उत्कट – रंग कथा २२ ‘ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी सौ. अदिती जोगळेकर -हर्डीकर यांनी ‘ चित्र आस्वाद ‘ या विषयावर संवाद साधला. तर गणेश कळसकरांच्या तैलचित्राच्या प्रात्यक्षिकाला  सकाळी ११ वाजता चांगला प्रतिसाद मिळाला.

अदिती जोगळेकर -हर्डीकर म्हणाल्या, ‘संगीत ऐकण्याची मैफल होते, तशी चित्रांचा आस्वाद घेण्याची मैफल असली पाहिजे. चित्र आस्वाद ही आपड सर्वांमध्ये निर्माण झाली पाहिजे. कंपोझिशन, फ्रेम, रचना या गोष्टी सर्वांना समजून घेता आल्या पाहिजेत. चित्र फक्त आर्ट गॅलरीत नसतात, चित्रांच्या फ्रेम आपल्या अवती भवती असतात. चित्रात दिसणाऱ्या गोष्टी आपल्या जवळच कोठेतरी असतात.

प्यासा सारख्या चित्रपटातील फ्रेम या चित्रकाराच्या तोडीच्या आहेत. नाटकातील नेपथ्य देखील चित्रांच्या तोडीचा दृश्य परिणाम साधत असतात. म्हणून चित्रकारांच्या नजरेने पाहता आले पाहिजे.आपल्याला चित्राशी जोडून घेता आले पाहिजे. मिलिंद संत, डॉ. पं.समीर दुबळे, श्रीमती अमिता पटवर्धन, श्रीमती चेतना गोसावी, शिवाली वायचळ, भार्गवी कानडे यांनी स्वागत केले.

कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गट हा विविध कला प्रकारात काम करणाऱ्या ज्ञानप्रबोधिनीच्या  माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला एक महत्वाचा गट आहे. या गटाने या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दि. ९ ते १२ जून २०२२ या काळात राजा रवीवर्मा कला दालन, घोले रस्ता, पुणे येथे  हे प्रदर्शन सुरू  आहे. १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. या प्रदर्शनात सुमारे ७० कलाकारांनी आपली चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.

चित्रकारांची प्रात्यक्षिके आणि संवाद

प्रत्येक दिवशी प्रदर्शनाबरोबरच अनेक मान्यवर कलाकारांचे प्रात्यक्षिक सत्रे आयोजित केलेली आहेत. शनीवारी सकाळी ११ वाजता ‘ चिंटूच्या निमित्ताने ‘ विषयावर चारुहास पंडित तर सायंकाळी ५ वाजता विलास कुलकर्णी यांनी लँडस्केप या विषयावर संवाद साधणार आहेत. रविवारी ११ वाजता स्नेहल पागे पोट्रेटचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. दुपारी ४ वाजता संजय देसाई जलरंगातील प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता ‘ कला- संदर्भ आणि अर्थ ‘ या  विषयावर  श्रुती निरगुडकर संवाद साधणार आहेत. या आयोजनामध्ये ‘आर्टिस्ट कट्टा ‘ या संस्थेचे महत्वाचे योगदान आहे.

Share to