आमदार जगतापांनी बजावला मतदानाचा हक्क तर आमदार बनसोडे नॉट रिचेबल, कार्यकर्त्यांची पळापळ
पिंपरी (प्रतिनिधी) – राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज शुक्रवारी (दि. 10) मतदान होत आहे. या मतदानाला जाण्याचा निर्धार चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला होता. गंभीर आजारी असताना देखील पक्षाचा विश्वास जपत रुग्णवाहिकेतून पुणे–मुंबई महामार्गाने मुंबईचा प्रवास करून त्यांनी आज मतदान बजावले. तर, दुसरीकडे पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे ‘नॉट रिचेबल’ असल्याने राष्ट्रवादीचे टेन्शन वाढल्याचे दिसत होते.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी निवडणुका सुरू आहेत. सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस लागली असल्याने प्रत्येक आमदाराचे मत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षाने आपापल्या आमदारांना मतदानाचा हक्क बजावण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेचा आदर करत चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप मुंबईकडे रुग्णवाहिकेतून रवाना झाले होते. आमदार जगताप हे आजारांनी त्रस्त आहेत. मात्र, पक्षाने दिलेल्या सूचनांचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगत मतदानाला जाण्याचा कुटुंबियांकडे आग्रह धरला. त्यानुसार ते पुणे-मुंबई महामार्गाने रुग्णवाहिकेतून प्रवास करत ते मुंबईत पोहोचले.
तर, दुसरीकडे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे विधानभवनात पोचले नसल्याची माहिती दुपारपर्यंत सोशल मीडियावर फिरत होती. त्यांच्याशी संपर्क केला जात आहे. मात्र, ते नॉट रीचेबल आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते देखील अनभिज्ञ असून पक्षाचे टेन्शन वाढल्याचे वातावरण पहायला मिळाले. मात्र, आमदार बनसोडे हे विधानभवनात जाऊन मतदानाचा हक्क बजावतील असा आशावाद राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी व्यक्त केला होता.