राज्यसभा निवडणूक विजयाचे श्रेय आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांचे – देवेंद्र फडणवीस
पिंपरी (प्रतिनिधी) – राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार राज्यसभेवर निवडून आले. शिवसेनेचे संजय पवार यांना धनंजय महाडीक यांनी पराभव केल्याचा विजय भाजपाच्या नावाने अधोरिखीत झाला. भाजपाच्या नेत्यांनी विजयाचे श्रेय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. मात्र, फडणवीस यांनी हे श्रेय आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे असल्याची प्रतिक्रिया दिली.
या निवडणुकीत पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत आणि धनंजय महाडिक विजयी ठरले आहेत. संजय राऊत यांना पहिल्या पसंतीची 41 मते मिळाली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांना 43 मते, पीयूष गोयल यांना 48 मते, अनिल बोंडे यांना 48 मते आणि इम्रान प्रतापगढी यांना 44 मते मिळाली आहे. भाजपचे धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे आजारी आहेत. आपल्या मतदानाचा आणि पक्षनिष्ठतेचा हक्क बजावण्यासाठी दोघांनीही थेट रुग्णवाहिकेतून हजेरी लावली. त्यांच्या या हिंमतीला दाद देत भाजपने हा विजय त्यांच्या नावे घोषित केला आहे.
निवडणुकीच्या या लढाईत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षासाठी मेहनत घेतली. त्यांनी महाविकास आघाडी न फोडता अपक्षांना आपल्या बाजूने करत हा विजय आपलासा केला. त्याचे कौतुक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही आवरले नाही. तसेच, हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पीत केला.