पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील विमानतळावर दाखल, थोड्याच वेळात देहूत आगमन

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील विमानतळावर दाखल झाले आहेत. काही वेळात ते देहू गावात पोहोचणार आहेत. देहूला ही पहिलीच भेट आहे. संत तुकाराम महाराज ज्या शिळेवर बसून भजन करत त्या ठिकाणी शिळा मंदिर उभारण्यात आलेल्या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. या शिळा मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर मोदींच्या हस्ते येथील स्तंभावर भागवत धर्माची भगवी पताका फडकणार आहे. हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

थोड्याच वेळात नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर आगमन होईल. तेथून ते रस्तेमार्गाने देहूला जातील. देहूतील मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता ते वारक-यांना संबोधित करतील. पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी देहू नगरीत मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत आल्यानंतर वारकरी वेषातील चारशेजण त्यांच्या स्वागतासाठी तयार असतील. तेथून ते मंदिरात प्रवेश करतील.येथील स्तंभाला गजलक्ष्मी वारकरी पताका ध्वजस्तंभ असे नाव दिले आहे. स्तंभाच्या पायथ्यास चार हत्ती व चार फुले आहेत. तेथून 61 फूट उंचीचा ध्वजस्तंभ आहे. खांबाच्या वरील बाजूस बॉल बेरिंग पुली लावली आहे. त्यामुळे वारा कुठल्याही दिशेला असला तरी पताका स्तंभाभोवती गुंडाळली जाणार नाही, असे दिलीप नथू आंबेकर यांनी सांगितले.

देहू येथील शिळा मंदिराजवळ गजलक्ष्मी वारकरी ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजावर भागवत धर्माची पताका फडकाविण्यात येणार आहे. मोदी यांचे आज महाराष्ट्रात तीन कार्यक्रम आहेत. सुरुवातीला ते देहूत येतील. त्यानंतर मुंबईतील दोन कार्यक्रमांना उपस्थित राहतील. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते एकाच व्यासपीठावर असतील.

Share to