शिवसेना व भाजपा कार्यकर्ते आमने-सामने, शिवसैनिकांवर गुन्हे दाखल ?

पिंपरी – विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार उमा खापरे यांच्या स्वागत रॅली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येताच आंदोलनकर्ते शिवसैनिक व भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. गद्दार आमदारांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. देवेंद्र फडणवीस तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणा भाजपाकडून करण्यात आली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. मात्र, पोलिसांनी मध्यस्ती करताच तणाव निवळला.

शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार डळमळीत झाल्याचे चित्र आहे. गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांचा निषेध करण्यासाठी शहरातील शिवसैनिकांकडून पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

त्याचवेळी विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उमा खापरे यांचे स्वागत करून शहर भाजपाकडून रॅली काढण्यात आली. पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारक येथे ही रॅली आली. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि शिवसैनिक एकमेकांच्या समोर भिडले. तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर भाजपाची रॅली मार्गस्थ झाली.

शिवसैनिकांवर गुन्हा दाखल ?

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी शिवसेनेने पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. यातून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पूर्वपरवानगी न घेता जमाव केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज काल रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

Share to