एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्त पिंपरी-चिंचवडमध्ये फ्लेक्सबाजी, ठाकरे समर्थकांचा भाजपावर गंभीर आरोप
- शिवसैनिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचे भाजपाचे षडयंत्र ?
पिंपरी – शिवसेनेचे 40 आमदार फोडून मुंबईतून पलायन करणारे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची आग पिंपरीपर्यंत पोहोचली आहे. शिंदे यांच्या समर्थनार्त पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख चौकात लावण्यात आलेले फ्लेक्स उध्दव ठाकरे समर्थकांनी आक्षरषः फाडून टाकले. हे फ्लेक्स एकनाथ शिंदे समर्थकांनी लावले नसून शिवसैनिकांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपाकडून लावण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी पक्षाचं नाव न घेता केला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह मंबईतून धूम ठोकली. सुरत त्यानंतर गुवाहटीत तळ ठोकून ते ठाकरे सरकारला आव्हान देत आहेत. या बंडानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिक खवळून उठले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्त आंदोलने केली. त्यांचे पुतळे जाळले. हा संताप आता पिंपरी-चिंचवडमध्ये देखील उमटताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे समर्थन करणारे फ्लेक्स रातोरात शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये लावण्यात आले. हे फ्लेक्स उध्दव ठाकरे समर्थक शिवसैनिकांच्या दृष्टीपथास पडताच त्यांच्यातील संताप उसळला.

आज सकाळी ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी बंडखोर शिंदे समर्थकांच्या विरोधात घोषणाबाजी करत शहरातील काही ठिकाणी लावण्यात आलेले सर्व फ्लेक्स फाडून टाकले. शिवसैनिकांनी बंडखोरांच्या निषेधार्त घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे यांच्या फोटोला जोडे मारून तिर्व निषेध केला. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी खूप गंभीर आरोप केला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये एकनाथ शिंदे समर्थक एकही शिवसैनिक नाही. त्यामुळे हे फ्लेक्स बंडखोरीला समर्थन देणा-या कार्यकर्त्यांनी लावले नसून भाजपकडून जाणिवपूर्वक लावण्यात आल्याचा आरोप ठाकरे समर्थकांनी पक्षाचं नाव न घेता केला. शहर शिवसेनेमध्ये तेढ निर्माण करून वाद पेटवून देण्याचे कुटाळ कारस्तान भाजपाचे नाव न घेता काही नेत्यांकडून रचले गेले आहे. शिवसैनिक अशा कुटाळखोरांना कदापी भिक घालत नाही, अशा शब्दांत शिवसैनिकांनी नाव न घेता भाजपाच्या नेत्यांवर ताशेरे ओढले आहेत.