दिवंगत वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे प्रणेते होते – अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे
पिंपरी :- दिवंगत वसंतराव नाईक हे केवळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नव्हते तर ते हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया मजबूत करणारे अभ्यासू व कुशल राजकारणी देखील होते असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, सिताराम राठोड, प्रफुल्ल पुराणिक, रावसाहेब राठोड, रवी राठोड, अविनाश राठोड, सुनिल राठोड उपस्थित होते.
वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी मंत्री म्हणून, त्यानंतर महसूल मंत्री म्हणून देखील काम पाहिले. वर्ष १९६३ मध्ये नाईक मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून सलग १२ वर्षे ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते. महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्या कारकीर्दीत झाली. शिक्षण आणि शेती या दोन्ही घटकांना त्यांनी प्राधान्य दिले.
कृषी विद्यापीठांची स्थापनाही त्यांनी केली. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतक-यांच्या कल्याणासाठी दिले. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून वर्ष १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नाईक यांचा एक जुलै हा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. वसंतराव नाईक हे वर्ष १९७७ मध्ये वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. अशा या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे जीवनचरित्र प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे असे सांगून विकास ढाकणे यांनी कृषीदिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.