विकासकामांच्या 28 कोटींच्या खर्चाला स्थायी समितीची मान्यता

पिंपरी- महापालिका सभा, विधी समिती आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संपन्न झालेल्या बैठकीमध्ये स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे २८ कोटी ३४ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रभाग क्र. ४ मधील दिघी येथील स्मशानभूमीला सीमाभिंत बांधणे, बोपखेल येथील महापालिका शाळेच्या वर्गखोल्या बांधणे, पिंपरी वाघेरे येथील ५ लाख लिटर्सची क्षमता असलेली उंच टाकी पाडून नवीन उंच टाकी बांधणे, महापालिकेच्या मंजूर विकास योजनेतील मौजे पुनावळे आणि रावेत येथून जाणाऱ्या मुंबई – बेंगलोर ६० मीटर महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या १२०० मीटर सर्व्हिस रस्त्याने बाधित जमिनीचे भूसंपादन करणे आदी विषयांना महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. त्यास प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.

स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. प्रभाग क्र.२९ पिंपळे गुरव परिसरात जलनिःसारण नलिका टाकणे व सुधारणा कामे करण्यात येणार असून याकामी २१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश, पि.टी. गणवेश आणि स्वेटर खरेदीकामी होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी येथील तपोवन रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. याकामी १ कोटी ११ लाख रुपये खर्च होणार आहेत. नाशिक फाटा ते वाकड रस्ता आणि पदपथांची देखभाल दुरुस्ती विषयक कामे करण्यासाठी ७८ लाख रुपये खर्च होतील. काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्त्यावरील स्टॉर्म वॉटर चेंबर्सची सफाई करणे तसेच इतर स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून याकामी १ कोटी १७ लाख रुपये खर्च होईल. प्रभाग क्र.९ मधील गोडाऊन इमारत तसेच इतर मिळकतींची दुरुस्तीची स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या ३४ लाख रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.३१ मधील नेताजीनगर तसेच उर्वरित भागात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे तसेच एकत्र येणा-या जलनि:सारण व स्ट्रॉम वॉटर लाईन विलगीकरण करणे आणि नाल्यातील जलनि:सारण वाहिनी समांतर रस्त्यावर स्थलांतरित करण्यात येणार असून याकामी ३९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्र. ३० मध्ये एकत्र येणाऱ्या जलनि:सारण व स्ट्रॉम वॉटर लाईन विलगीकरण करणे तसेच कासारवाडी येथील शास्त्रीनगर, वंजारी चाळ , फुगेवाडी येथील फुगे चाळ, वडार वस्ती व इतर परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात येणार असून याकामी ५२ लाख रुपये खर्च होणार आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेकरीता अल्ट्रा हाय डेफिनेशन कॅमेरा सिस्टीम फॉर अॅडवान्स संच खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ५ कोटी ५२ लाख रुपये खर्चास, पीएमपीएमएल संस्थेस सन २०२१- २२ या वर्षातील संचलन तूट रक्कम १६ कोटी रुपये अदा करण्याच्या खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी आजच्या बैठकीत मान्यता दिली.

Share to