पिंपरी चिंचवडमधील एकाच गृहप्रकल्पात ४३ जणांना करोनाची लागण

पिंपरी –

रहाटणीतील एकाच गृहप्रकल्पात गेल्या नऊ दिवसांत करोनाचे ४३ सकारात्मक रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून महापालिकेने गृहप्रकल्पाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत.

या ठिकाणी २१ ऑगस्टपासून सकारात्मक रुग्ण आढळून येत आहेत. येथील रहिवाशांची दररोज टप्प्याटप्प्याने करोना चाचणी करण्यात येत आहे. त्यात दररोज तीन ते चार सकारात्मक रुग्ण आढळून येत आहेत. २७ ऑगस्टला एकाच दिवशी १३ रुग्ण आढळून आले. तर, रविवारी (२९ ऑगस्ट) १७५ रहिवाशांची चाचणी केली, त्यात चार करोनाबाधित होते. महापालिकेने तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. येथील रहिवाशांची दररोज करोना चाचणी केली जात आहे.

यासंदर्भात, पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले की, सर्व रुग्ण स्थिर आहेत. त्यांच्यात करोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. करोनाचा संसर्ग होण्यामागची कारणे शोधली जात आहेत. महापालिकेच्या वतीने पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.

Share to