शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील लाखोंच्या वस्तुंचा कोळसा
पिंपरी – शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील टीव्ही, फ्रिज, एसीसह फर्निचर खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. सांगवी येथील साईनाथ नगरमधील यशोदा पुरम या सोसायटीत गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथील साईनाथ नगरमधील यशोदा पुरम या सोसायटीतील इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट फ्लॅटच्या खिडकीतून बाहेर पडत होते.
त्यामुळे आग लागल्याची बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून रात्री पावणे बाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.