कुंदाताईंच्या सामाजिक उपक्रमाला भरभरून शुभेच्छा – हभप ढोक महाराज
- उन्नतिच्या गणपती महोत्सवात पर्यावरणीय गणेशमुर्त्यांचे ‘ ऐच्छिक दान ‘
- पिंपळे सौदागर येथील गणेश भक्तांकडून जल्लोषपूर्ण वातावरण
पिंपरी :- गेल्या पाच वर्षांपासून ‘ उन्नति चा गणपती महोत्सव ‘ हा अनोखा उपक्रम उन्नती सोशल फाउंडेशन पिंपळे सौदागरमध्ये राबवित आहे. या उपक्रमात पर्यावरणपूरक गणेशमुर्त्यांची निर्मिती केली जाते. ‘ ऐच्छिक दान ‘ उपक्रमांतर्गत घरोघरी, गणेश मंडळांना सामाजिक भान जपत मुर्त्यांचे वितरण केले जाते. त्यातून केवळ सामाजिक आणि पर्यावरणीय सौहार्द जपण्याचे कार्य उन्नतीकडून घडत आहे, त्यांच्या या कार्याला माझ्या भरभरून शुभेच्छा, असे मत ह.भ.प. ढोक महाराज यांनी व्यक्त केले.
पिंपळे सौदागर येथे उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात ‘ उन्नति चा गणपती महोत्सव २०२२’ या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे ह.भ.प ढोक महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ह.भ.प ढोक महाराज, उन्नती सोशल फाउंडेशन तथा भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, उद्योजक संजय भिसे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, पी. के. स्कूलचे चेअरमन जगन्नाथ अप्पा काटे, हभप संतोष महाराज पायगुडे, भरत काटे, खंडु झिंजुर्डे, विजु अण्णा जगताप, चंद्रकांत काटे, विकास काटे, शंकर चोंधे, रमेश वाणी, डॉ. सुभाषचंद्र पवार, शंकरराव पाटील, भागवत झोपे, राजेंद्रनाथ जयस्वाल, विठाई वाचनालयाचे सभासद व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
उपस्थित नागरिक अजय पाटील म्हणाले, कुंदाताईंच्या सामाजिक उपक्रमाची दखल नागरिक घेतीलच आणि मतरूपी आशीर्वादाच्या बळावर कुंदाताईंना आगामी महापालिका निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी करतील.
कुंदाताई भिसे म्हणाल्या, गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणपती उत्सव साजरा करता आला नाही. यंदा सरकारने गणेश उत्सव साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध लावले नाहीत. त्यामुळे सर्वच ठिकाणी गणपती उत्सव जल्लोषात साजरा होत आहे. पाच वर्षांपासून उन्नती पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेत आहे. ” उन्नति चा गणपती महोत्सव 2022 ऐच्छिक दान ” या उपक्रमातून परिसरात पर्यावरण रक्षणासाठी शाडूच्या मातीपासूनच तयार होणारा गणपतीच बसविण्याचे नागरिकांना आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या आवडीनुसार महिनाभर गणेश मूर्तीचे बुकिंग घेतले. यात परिसरातील गणेश मंडळांचा देखील समावेश होता. या अभिनव उपक्रमाला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला. पर्यावरण रक्षणासाठी यापुढेही ही मोहीम अशीच सुरु ठेवणार आहे.