आमदार सुनिल टिंगरे यांच्या उपोषणानंतर महापालिका प्रशासन ऍक्शन मोडवर

  • वडगाव शेरी मतदारसंघात अतिरिक्‍त आयुक्‍तांच्या उपस्थितीत विविध कामांची पाहणी

पुणे, (प्रतिनिधी) – वडगाव शेरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार सुनिल टिंगरे यांनी केलेल्या उपोषनानंतर महापालिका प्रशासन ऍक्‍शन मोडवर आले आहे. शुक्रवारी (दि. 7) अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आमदार टिंगरे यांनी मांडलेल्या प्रलंबित कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तसेच त्यावर कार्यवाहीचे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय पोरवाल रस्त्यांच्या समातंर रस्त्यावरील भिंत पाडून आमदार टिंगरे यांनीही कच्चा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला.

या वेळी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विसास ढाकणे, उपायुक्त किशोरी शिंदे, सहायक आयुक्त नामदेव बजबलकर, अधिक्षक अभियंता मीरा सबनीस, कार्यकारी अभियंता संजय धारव, कनिष्ठ अभियंता शाहिद पठाण उपस्थित होते.

मतदारसंघातील वाहतुक कोंडी, रखडलेले रस्ते, उड्डाणपूल, लोहगावचा पाणी प्रश्न याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने आमदार सुनिल टिंगरे यांनी गुरूवारी महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. त्यावर प्रशासनाने नरमाईची भुमिका घेऊन प्रलंबित प्रश्नाबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळीच महापालिकेची यंत्रणा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कामाला लागली. पालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन रखडलेल्या कामांची पाहणी केली. तसेच संबधित अधिकाऱ्यांनाही त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

अतिरिक्‍त आयुक्त विकास ढाकणे यांनी विमानतळ रस्त्यावरील 509 चौकातील रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी चौकातील बुध्दविहार स्थलांतरीत केल्या जाणाऱ्या पर्यायी जागेची पाहणी करून संबधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. त्यानंतर धानोरीतील लक्ष्मी टाऊनशीप ते स्मशान भुमी या रस्त्यांची पाहणी केली. त्यासंबधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी जागेवर संबधितांना दिले. पुढे त्यांनी धानोरीतील सर्व्हे. न. 5 ते 12 जागेची पाहणी करून त्यासंदर्भात पुढील आठवड्यातच संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तसेच वन विभागाच्या जागेसंदर्भात बैठकिचे आयोजन केले जाईल असे सांगितले.

या वेळी अतिरिक्‍त आयुक्त विकास ढाकणे यांनी लोहगावच्या पाणी पुरवठ्याबाबत येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया राबविली जाईल असेही सांगितले. तसेच नगर रस्ता बीआरटी काढण्याबाबत वाहतुक पोलिस आणि पीएमपी समवेत बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही केली जाईल आणि नदीकाठचा रखडलेला नदीकाठच्या ज्या जागा अद्याप ताब्यात आलेल्या नाहीत, त्याबाबत घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलाबाबत येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.

Share to