वाल्हेकरवाडीत प्राधिकरणाच्या जागेवर सुसज्ज जिजाऊ दवाखान्याची उभारणी करा

- विभागप्रमुख संदिप भालके यांची महापालिकेकडे मागणी..
- शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन…
पिंपरी (दि. २७ जुलै २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वाल्हेकरवाडी येथे दवाखाना आहे. दरम्यान दवाखान्याची इमारत नादुरुस्त झाल्याने हा दवाखाना परिसरातील खासगी इमारतीत स्थलांतरित करण्यात आला आहे. ही जागा दवाखान्यासाठी अपुरी पडत असल्यामुळे वाल्हेकरवाडीतच प्राधिकरणाच्या जागेवर सुसज्ज अशा जिजाऊ दवाखान्याची उभारणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख संदिप भालके यांनी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे केली आहे.
याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळासह नुकतीच त्यांची भेट घेऊन त्यांना वाल्हेकरवाडी दवाखान्याच्या समस्यांबाबत निवेदन दिले. यावेळी शहर संघटक संतोष सौंदणकर, उपशहरप्रमुख संतोष पवार, विभाग प्रमुख संदीप भालके, नितीन दर्शिले, शाखा प्रमुख अमित दर्शिले आदी उपस्थित होते.
संदिप भालके यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चाळीस वर्षांपासून वाल्हेकरवाडी परिसरात महापालिकेचा दवाखाना आहे. सद्यस्थितीत दवाखान्याची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे महापालिकेने दवाखाना तात्पुरता परिसरातील खाजगी भाड्याच्या इमारतीत स्थलांतरित केला आहे. परंतु सध्याची ही भाड्याची जागा अपुरी व गैरसोयीचे ठरत आहे. तसेच मोठ्या स्वरूपात पालिकेला खासगी इमारतीचे भाडेही द्यावे लागत आहे. याशिवाय रुग्णांना आणि तेथील कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वाल्हेकरवाडी प्रभागाची लोकसंख्या ४० ते ५० हजारांच्या आसपास आहे. बहुतांश नागरिक महापालिकेच्या या दवाखान्यात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे महानगरपालिकेने वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौकातील प्राधिकरणाची जागा अतिक्रमण होण्याआधी ताब्यात घ्यावी. त्या मोकळ्या भूखंडावर लवकरात लवकर सर्वसोयींनीयुक्त अशा जिजाऊ दवाखान्याची उभारणी करावी. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल.
याबाबत महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आयुक्तांसोबत बैठक घेऊन त्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे, असे संदीप भालके यांनी निवेदनात म्हटले आहे.