चिंचवडे पाटील परिवारातर्फे चिंचवडमध्ये भव्य भजन स्पर्धा
- टीव्ही चॅनेल आणि यू-ट्यूबद्वारे लाईव्ह प्रक्षेपणाचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ
- लोकमान्य हॉस्पीटलचे डॉ. रोहन काटे यांचा ‘कोविड योध्दा’ पुरस्काराने सन्मान
पिंपरी (प्रतिनिधी) – कै. ज्ञानोबा उर्फ माऊली जिवाजी चिंचवडे पाटील, कै. रामचंद्र जिवाजी चिंचवडे पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य वारकरी भजन स्पर्धा घेण्यात आल्या. चिंचवड येथील न्यू एसकेएफ कॉलनी, नागेश्वर शिव मंदिरातून भजन स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. लकी टीव्ही चॅनेलद्वारे सुमारे 50 हजार नागरिकांना या भजन स्पर्धेचा घरात बसून लाभ घेता आला. तर, प्रेक्षकांसाठी यु-ट्यूब चॅनेलद्वारे स्पर्धा लाईव्ह सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
पै. भारत विजयराव चिंचवडे पाटील (राष्ट्रीय खेळाडू) यांच्या सौजन्याने रविवारी (दि. ५) या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उदघाटन अॅड. विकास ढगे पाटील (विश्वस्त आळंदी देवस्थान ट्रस्ट), गुरुवर्य पुंडलिक महाराज गरुड (इंदोरी देवस्थान), संगीत तज्ञ गुरुवर्य अभिनव गंधर्व पं. रघुनाथ खंडाळकर गुरुजी व अॅड. गोरक्षनाथ झोळ (अध्यक्ष पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असो.) यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आलेल्या अनेक भजनी मंडळांपैकी विशेष प्राविण्य असलेल्या निमंत्रित भजन मंडळांना संधी देण्यात आली. स्पर्धेत राज्य शासनाच्या कोविड काळातील मार्गदर्शक सूचनांचा अंतर्भाव करून प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली. ज्येष्ठ पखावज वादक पांडुरंग दातार, खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे पाटील, नगरसेवक सुरेश भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे पाटील, भाजपचे नेते शेखर चिंचवडे पाटील, अॅड. सुहास पडवळ, पिंपरी-चिंचवड वकील संघटनेचे पधादिकारी, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, आप्पा बागल, माउली सूर्यवंशी आदींनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन कौतुक केले.
स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक विभागून देण्यात आले. प्रथम क्रमांक भैरवनाथ मंडळ- काळजेवाडी हवेली व श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज भजनी मंडळ- वाकड यांना, व्दितीय क्रमांक श्री शितळादेवी भजनी मंडळ- शिवने व श्रीनाथ भजनी मंडळ- लंपतळवाडी पुरंदर यांना तर तृतीय क्रमांक ओम नमःशिवाय भजनी मंडळ- कोंढवे धावडे व श्री गणेश भजनी मंडळ- जेऊर पुरंदर यांना देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण संगीत अलंकार राधाकृष्ण गरड व संगीत विशारद चंद्रभागा सातव काटे यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण आळंदी देवस्थानचे विश्वस्त व आर्थिक क्षेत्रात ख्याती असलेले डॉ. अभय टिळक, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संत साहित्याचे अभ्यासक हभप ऋषिकेश महाराज चोरगे, संगीत तज्ञ रामचंद्र आय्यर व छाया मानकर यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी डॉ. रोहन काटे (लोकमान्य हॉस्पिटल- चिंचवड) यांच्या कोव्हीड काळातील कार्याची दाखल घेऊन त्यांना कोव्हीड योद्धा म्हणून ‘मानपत्र’ आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. अभयजी टिळक यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. डॉ. रोहन काटे यांनी मनोगतात शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे. निरोगी आयुष्य जगणे हीच काळाची गरज असल्याचे उपस्थितांना सांगितले. तसेच, प्रमुख पाहुणे आळंदी संस्थांचे विश्वस्त डॉ. अभय टिळक व देहू संस्थांचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांनी संतांचे व वारकरीसंप्रदायचे महत्व मनोगतातून प्रकट केले.
सर्वांचे स्वागत पै. भारत विजयराव चिंचवडे पाटील (राष्ट्रीय खेळाडू ) यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन हभप विजय बोत्रे पाटील यांनी केले. सर्व मान्यवरांचे व मंडळांचे आभार अॅड. भूषण विजय चिंचवडे पाटील यांनी मानले. स्पर्धेसाठी न्यू एसकेएफ कॉलनी कमिटी, नागेश्वर शिव मंदिर कमिटी, देवेंद्र घोडके, संजय चिंचवडे पाटील, सागर साखरे, ओंकार विनोदे, सुनील शिंदे, शाम शिंदे व गिरीश आगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.