इस्लामपुरातील दत्त टेकडीचा बदलणार ‘लूक’
– साडे पाच कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाची मान्यता
– राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पाठपुरावा
सांगली / प्रदीप लोखंडे
उरुण इस्लामपूर (जि. सांगली) शहरातील दत्त टेकडी परिसर नयनरम्य पर्यटनस्थळ बनणार आहे. या परिसराचा विकास करण्यासाठी राज्यशासनाच्या वन विभागाकडून पाच कोटी 45 लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शासनाच्या वन विभागाचे उपसचिव विवेक होशिंग यांनी नुकताचा याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध करत ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
मुंबई येथील मंत्रालयात मंत्री मुनगंटीवार यांच्या दालनात नुकतीच दत्त टेकडीच्या विकासासाठी बैठक पार पडली होती. या वेळी शिराळा विधानसभेचे माजी आमदार शिवाजीराव नाईक देखील उपिस्थत होते. या बैठकीत जयंत पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दत्त टेकडीच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती.

त्यानुसार 5 कोटी 45 लाख रुपयेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांनी देखील तांत्रिक सहमती दिली आहे. 25 सप्टेंबर 2019 च्या परिपत्रकान्वये स्थापत्य व विद्युत कामाशी संबंधित 15 कोटी किंमती पर्यंतच्या कामांना संबधित मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांनी तांत्रिक सहमती दिली आहे. त्यानंतर प्रशासकीय मान्यता देण्याबाबत अधिकार संबंधित उपभोक्ता विभागास देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील दत्त टेकडी परिसर विकास करणे या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर साडे पाच कोटी रुपये रुपयांच्या निधीला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात करून या परिसराचा लूक बदलणार असल्याचे चित्र आहे.
——————
- प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
- मो. नं – 7350266967