शिक्षक नगरसेविकेला स्टंटबाजी आली अंगलट; आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात
पिंपरी –
कासारवाडी प्रभाग 30 मध्ये स्मार्ट सिटीतून रस्ते खोदाईची कामे सुरु आहेत. ही कामे गणेशोत्सव काळात बंद करावीत, म्हणून भाजपच्या शिक्षक नगरसेविका आशा शेडगे-धायगुडे यांनी काही महिलाना सोबत घेवून आज (गुरुवारी) आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकून आंदोलन केले. यावेळी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देवून निषेध व्यक्त केला. दरम्यान, महापालिका आयुक्तांवर फेकण्यासाठी आणलेली शाई ऐनवेळी नामफलकांवर फेकल्याने सुरक्षा विभागाची एकच धांदल उडाली. सुरक्षा विभागाने तत्काळ पोलिसांना पाचारण केल्याने नगरसेविकेसह दहा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत केबल टाकली जात आहे. त्याकरिता अनेक ठिकाणी रस्ते खोदाई सुरु आहे. हे काम तत्काळ बंद करुन संबंधित ठेकेदार बदलण्यात यावा, अशी मागणी शेंडगे यांच्याकडून आयुक्तांकडे केलेली होती. मात्र, रस्ते खोदाईचे काम न थांबविता आणि ठेकेदार ही बदलला नाही म्हणून नगरसेविका चांगलाच पारा चढला होता. शेंडगे यांनी ठेकेदारास त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ठेकेदाराने आयुक्तांकडून तक्रार केली. त्यानूसार कासारवाडीत पोलिस बंदोबस्तात काम सुरु केले होते. अशी माहिती संबंधित अधिका-यांने दिली.

दरम्यान, गणेशोत्सव आणि सणासुदीत रस्ते खोदाई बंद करा, म्हणून नगरसेविका शेडगे यांनी दहा-बारा महिलांना घेवून महापालिका भवन गाठले. पहिल्या मजल्यावर स्मार्ट सिटीचे अशोक भालकर हे उपस्थित नसल्याने आयुक्तांचे दालनासमोर ठिय्या मांडला. आयुक्तासह अधिका-यांच्या विरोधात घोषणा सुरू केल्या. यावेळी आयुक्त राजेश पाटील हे बैठकीत असल्याने त्यांची भेट होवू न शकल्याने त्यांना निवेदन देण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेडगे यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोरील नामफलकावर शाई फेकून प्रशासनाचा निषेध केला. शाई फेकल्यामुळे सुरक्षा विभाग आणि पिंपरी पोलिसांनी नगरसेविका शेडगे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत नगरसेविका शेडगेसह महिला कार्यकर्त्यांवर पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
भाजप नगरसेविकेच्या कृत्यांचा निषेध
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नामफलकांवर शाई फेकणा-या भाजप नगरसेविका आशा शेडगे-धायगुडे यांच्या कृत्याचा सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी निषेध व्यक्त केला आहे. प्रभागातील रस्ते खोदाई बंद करण्याबाबत चर्चेने मार्ग काढता आला असता. त्यासाठी आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती. असे त्यांनी म्हटले आहे.