महावितरण तळवडे शाखाधिकाऱ्यांचा संगनमताने वीज कंपनीला लाखो रुपयांचा गंडा
पिंपरी- महावितरण तळवडे शाखा अभियांता यांनी संगनमताने 40 घरगुती व व्यापारी वीज जोड देऊन त्यापोटी प्रति कनेक्शन निर्धारित रक्कम भरुन न घेता कमी शूल्कात वीज जोड दिले. अधिकारी, शाखा अभियंता यांनी संगनमताने महावितरणचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याची धक्कादायक माहिती पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सचिव नितीन बोंडे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत उजेडात आणली आहे. या प्रकरणी दोषी अधिकारी व अभियंते यांच्यावर फौजदारी खटले दाखल करून या अधिकारी व अभियंता यांना महावितरण सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी सचिव नितीन बोंडे यांनी महावितरणकडे केली आहे.
महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयाकडून तळवडे येथील एका इमारतीच्या ४० घरगुती व व्यापारी वीज जोडणीसाठी १२७ किलो वॉट वीज भार मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी महावितरणच्या एनएससी योजनेंतर्गत १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवून त्याठिकाणी २०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. परंतु, ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढविणेचे काम झाले नसतांनाही तळवडे शाखा अभियंता यांनी ४० पैकी २२ वीज जोडण्यांना वीज मीटर बसविले आहेत.या सगळ्या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून,अधिकारांचा गैरवापर करणे,महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान,संगनमताने वीज कंपनीच्या हितांना बाधा पोहोचविणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नागरिकांचा आणि ग्राहकांचा जीव धोक्यात घालून वीज जोडण्या दिल्या जाणे हे गंभीर गुन्हे शाखाधिकारी यांनी केले असून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.
माहिती अधिकारात उजागर झालेल्या माहितीनुसार,सर्व्हिस कनेक्शन चार्जेस,अनामत रक्कम आणि ग्राहकाचा मंजूर लोड यात अपहार करण्यात आलेला आहे. ४० जोडण्याच्या घेतलेल्या शुल्कात आणि प्रत्यक्ष घाययाच्या रकमेत सुमारे पाच लाख रुपयांचा अपहार तळवडे शाखाधिकारी यांनी केल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय नियमानुसार १२७ किलो व्हॉट लोडची मंजुरी असताना शाखाधिकारी यांनी अर्जदाराला फक्त ४० किलो व्हॉट इतक्या लोडचे शुल्क भरण्याची चलने दिली. त्यामध्ये म्हणजे सुमारे ८७ किलो व्हॉट इतक्या लोडला अधिकार नसताना शाखाधिकारी यांनी केराची टोपली दाखवून गंभीर गुन्हा केला आहे. अर्जदाराने चलने भरल्यावर नियमानुसार ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर वीज जोडण्या दिल्या जाणे अपेक्षित असताना, शाखाधिकारी यांनी प्राधिकरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने २२ वीज जोडण्याचे वीज मीटर जागेवर बसविले जे देखील आर्थिक फसवणूक करत वीज कंपनीचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यात येते.
त्यामुळे या सगळ्या गैरकारभार आणि आर्थिक भ्रष्टाचार यामध्ये शाखाधिकारी आणि अन्य अधिकारी स्पष्टपणे दोषी असल्याचे उघड झाले आहे. शाखाधिकारी तळवडे यांनी २२ वीज जोडण्या देऊन सध्या असलेल्या १०० के व्ही ए ट्रान्सफॉर्मर वर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकून वीज ग्राहकांचा आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचे पापही केलेले आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आल्याने त्यांच्याविरोधात विद्युत सुरक्षा नियमांच्या आधारे देखील कारवाई केली जाण्याचे आवश्यकता आहे. महावितरण कंपनी सार्वजनिक असल्याने, याच्या ट्रान्सफॉर्मर आणि अन्य सगळ्या साहित्यांना आपल्या बापाचा माल समजून विकण्याचे धोरण संगनमताने सुरू आहे ज्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. या सगळ्या घटनेतील अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून नुकसान भरपाई यांच्या पगारातून वसूल व्हावी आणि महावितरण सेवा नियमांच्या उल्लंघन प्रकरणी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या अपहार प्रकरणी गुन्हे दाखल करून अशा घटनांना चपराक लावावा, अशी मागणी नितीन बोंडे यांनी केली आहे.
पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी संचालक हे 25 लाखांपेक्षा जास्त अंदाजपत्रकाची तपासणी करण्यास सांगत आहेत. स्वखर्चाने केलेल्या एक पूर्णांक तीन टक्के कामाची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांना पाठवत आहेत. वास्तविक कुठल्याही प्रादेशिक कार्यालयात असा नियम अस्तित्वात नाही आणि पुणे प्रादेशिक कार्यालया अंतर्गत येणाऱ्या तीन झोनपैकी केवळ पुण्यातच मनमानी पध्दतीने चुकीचे नियम लावून चुकीची कामे केली जात आहेत. इतर कोणत्याही झोनमध्ये अशा नियमाने काम सुरु असल्याचे दिसत नाही. प्रभारी संचालकाच्या मनमानीला चाप लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
संतोष सौंदणकर, पिंपरी-चिंचवड शहर संघटक शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)