अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पिंपरी –

महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे सलग्न आणि अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी आज (गुरुवारी) मुंबईत हातावर घड्याळ बांधले. त्यामुळे सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला असून अनेक नगरसेवक राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वाटेवर आहेत.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, संतोष बारणे,अभय मांढरे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, ऋषिकेश काशिद, योगेश साळुंखे, प्रविण बारणे, शहाजी लोखंडे, अक्षय बारणे, तुषार मोरे उपस्थित होते. बारणे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत बारणे हे प्रभाग क्रमांक 23 थेरगाव गावठाणमधून अपक्ष निवडून आले. सत्ताधारी भाजपशी अपक्ष नगरसेवकांनी आघाडी केल्यानंतर सर्वजण संलग्न झाले होते. भाजपकडून त्यांना स्थायी समिती सदस्य केले होते. मात्र, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला आहे.

Share to