257 अनधिकृत होर्डिग्जमधून महापालिकेच्या कोट्यावधी उत्पन्नावर मारला डल्ला

पिंपरी |प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेचे परवाना निरीक्षक, कार्यालयीन अधिक्षक आणि सेवानिवृत्त अधिका-यांच्या आर्शिवादाने अनधिकृत होर्डिंग्ज धंदा खुलेआम सुरु होता. आकाशचिन्ह व परवाना विभागाने सन 2018-2019 मध्ये पालिका जागेवर होर्डिग्ज उभारण्याची निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानूसार 323 जागेपैकी केवळ 66 जागेवर ठेकेदारांना होर्डिग्ज उभारण्यास वर्क आॅर्डर दिली. मात्र, पालिकेशी करारनामा न करता, वर्क आॅर्डर न घेता 257 जागेवर ठेकेदारांनी अनधिकृतपणे होर्डिग्ज उभारली आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षापासून ठेकेदारांनी परवाना निरीक्षक, तत्कालिन अधिका-यांना हाताशी धरुन विभागाच्या कोट्यावधी रुपयाच्या उत्पन्नावर डल्ला मारला आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई होईलच, पण ‘कुंपणच शेत खात’ असेल तर विभागाचे उत्पन्न वाढणार कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे परवाना निरीक्षक, सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक, वरिष्ठ अधिका-यांवर आयुक्त राजेश पाटील हे कोणती कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय नेते, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचा-यांच्या आशिर्वादाने अनधिकृत होर्डिंग्जचा धंदा जोरदार सुरू आहे. महापालिका हद्दीत आकाशचिन्ह व परवाना विभागाने होर्डिंग्जचे 2 हजार 13 परवाने अधिकृतरित्या वितरित केले आहेत. संबंधित विभागाने सन 2018-2019 मध्ये निविदा राबवून 323 जागेवर सात वर्षांसाठी होर्डिग्ज उभारण्याची परवानी देण्यात आली. मात्र, महापालिकेच्या 66 जागेवर होर्डिग्ज उभारण्याचे आदेश ठेकेदारांना देण्यात आले. त्यापैकी अजूनही 257 जागेवर होर्डिग्ज उभारण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे 257 होर्डिग्ज अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत.

महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत होर्डिंग्जकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष केले. हे अनधिकृत होर्डिंग्ज उभारल्याने कित्येक वर्षांपासून पालिकेचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात आहे. मात्र, होर्डिंग्ज उभारणाऱ्यांना राजकीय नेत्यांसह विभागातील त्या-त्या वरिष्ठ अधिका-यांचे अभय मिळाल्याने अनधिकृत होर्डिंग्जची संख्या वाढत गेली आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पनावर डोळा ठेवून अधिकारी व कर्मचारी हे ठेकेदारांना हाताशी धरुन लूटत असल्याचे दिसत आहे.

केवळ 35 होर्डिग्जवर कारवाई

दरम्यान, महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशाने आकाशचिन्ह व परवाना विभागाने अनधिकृत होर्डिग्जवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या जागेवर आकाशचिन्ह व परवाना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात 109 जागेवर 118 अनधिकृत होर्डिग्ज आढळून आले. त्यापैकी 35 हून अधिक होर्डिग्जवर धडक कारवाई केली. तर 25 होर्डिग्ज स्वताःहून मालकांनी काढून घेतले आहेत. तर संपुर्ण शहरातील पथदिव्यांवर लावलेले किआॅक्स अनधिकृत असून आतापर्यंत 17 हजार 207 किआॅक्स काढण्यात आले आहेत. अशी माहिती सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली.

परवाना निरीक्षक की ठेकेदार, दोषी कोण?

आकाशचिन्ह व परवाना विभागाने सन 2018-2019 मध्ये निविदा राबवून 323 जागेवर सात वर्षांसाठी होर्डिग्ज उभारण्याची निविदा राबविली. त्यातील केवळ 66 ठेकेदार संस्था होर्डिग्ज उभारण्याचे वर्क आॅर्डर दिली. परंतू उर्वरीत 257 जागांवर संबंधित ठेकेदारांनी परवानगी नसताना होर्डिग्ज उभारली आहेत. त्यामुळे पालिकेचे आदेश नसताना होर्डिग्ज उभारणे हे अनधिकृत असल्याचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित ठेकेदारांनी वर्क आॅर्कर नसताना शहरात अनधिकृत होर्डिग्ज उभारली आहेत. हे त्या-त्या परवाना निरीक्षकांना व ठेकेदारांना माहित होते. तरीही त्यावर पालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी कुठलीही कारवाई केली नाही. उलट दोन वर्षांपासून पालिकेच्या उत्पन्नावर ठेकेदार व कर्मचा-यांनी मिळून डल्ला मारला. त्यामुळे संबंधित परवाना निरीक्षकासह तत्कालिन कार्यालयीन अधिक्षकांवर आयुक्त राजेश पाटील हे कोणती कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.

Share to