दुकानाला लागलेल्या आगीत गंभीर भाजल्याने तरुणाचा मृत्यू
पिंपरी | महाईन्यूज
दुकानाला लागलेल्या आगीत गंभीर भाजल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 21 डिसेंबर 2020 रोजी सकाळी सातच्या सुमारास निगडीतील यमुनानगर येथे घडली. तब्बल दहा महिन्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकित अनिल अगरवाल (वय 25) याचा आगीत मृत्यू झाला. याप्रकरणी विनोद बगेश्वर पाठक (वय 45, रा. यमुनानगर, निगडी) आणि अजित बाळकृष्ण कुलकर्णी (वय 42, रा. बि. नं. 7/9 सेक्टर 21, यमुनानगर, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ यांनी शुक्रवारी (दि. 22 ऑक्टोबर 2021) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद याने यमुनानगर येथे व्हिजन कंम्प्युटर चालवण्यासाठी गाळा घेतला. त्यामध्ये बेकायदेशीरपणे 15 फूट उंचीचा पोटमाळा तयार केला. कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना अंकित अगरवाल याला तेथे राहण्यास सांगितले. 21 डिसेंबर 2020 रोजी सकाळी सातच्या सुमारास अचानकपणे गाळ्याला आग लागली. आगीत अंकित 98 टक्के भाजला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. परंतू, गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी एवढा विलंब का लावला, असा सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.