आता कच-यातील थर्माकॉलचा होणार पुनर्वापर, महापालिकेचा एक रुपयाही खर्च होणार नाही
पिंपरी | महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील दैनंदिन गोळा होणा-या कच-यात येणारा थर्माकॉल संकलीत करून त्यावर पुनर्वापर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका आणि मे. के. के. नाग प्रा. लि. यांच्यात एक वर्षाचा समजुतीचा करारनामा झाला आहे. आता कचरा गाड्यांमधून दैनंदीन कच-यात येणारा थर्माकॉल वेगळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यावर महापालिकेचा एक रुपया देखील खर्च होणार नसल्याची माहिती आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल रॉल यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन दैनंदीन कचरा उचलला जातो. त्याचे विलगीकरण केले जाते. मात्र, त्यामध्ये थर्माकॉलचे प्रमाण मोठे असून तो अविघटनशील कचरा आहे. त्याचे विघटन करण्याची यंत्रणा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे आजपर्यंत उपलब्ध झालेली नाही. थर्माकॉलच्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने मे. के. के. नाग प्रा. लि. या संस्थेसोबत एक वर्षासाठी समजुतीचा करारनामा केला आहे.
संकलीत कच-यातील थर्माकॉलवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यामळे शहरात दैनंदीन कच-यात मिळणारा थर्माकॉल वेचकांच्यामार्फत संस्थेला दिला जाणार आहे. त्यापोटी संस्थेकडून प्रतिकिलो 10 रुपये इतकी रक्कम वेचकाला दिली जाणार आहे. हा थर्माकॉल कचरा शहरातून उर्से येथील थर्माकॉल पुनर्वापर प्रकल्पाकडे हलवला जाणार आहे. त्याठिकाणी प्रक्रिया करून तो पुनर्वापरासाठी तयार केला जाणार आहे. याकरिता, महापालिकेचा एक रुपयाही खर्च होणार नाही. उलट कचरा वेचकांना अतिरिक्त रक्कम मेहताना संबंधित संस्था देणार आहे. आजअखेर एकूण 215 किलो थर्माकॉल उचलण्यात आलेला आहे. त्यावर पुनर्वापर प्रक्रिया करण्यात आली आहे. थर्माकॉलचा पुनर्वापर होत असल्यामुळे शहरात दैनंदीन कच-यामधील थर्माकॉलचे प्रमाण कमी होणार आहे, अशी माहिती डॉ. रॉय यांनी दिली.