दापोडीत ‘पीएमपीएमएल’ बसने घेतला पेट, धुराचे लोट अन प्रवाशांची घबराट


पिंपरी | महाईन्यूज

पिंपळे गुरवकडून दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावर पीएमपीएमएल बसने आज अचानक पेट घेतली. चालकाने सतर्कता बाळगून आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र, चालकाच्या केबिनमधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

पीएमपीएमएलच्या अनेक बसेस जुन्या झाल्या आहेत. आज सकाळी पिंपळे गुरव येथून दापोडीकडे बस निघाली होती. दोन्ही गावच्या मांधोमध असलेल्या पुलाच्या जवळ बस पोहोचली असता चालकाच्या केबिनमधून अचानकपणे धूर येऊ लागला. काहीतरी पेटल्याचे लक्षात येताच चालकाने बस जाग्यात थांबवली. खाली उतरून पाहिले असता मोठया प्रमाणात धूर येत होता. त्यावर चालकाने त्वरित वाहकाला माहिती दिली. त्यांनी लागलीच प्रवाशांना बसच्या खाली उतरण्यास सांगितले. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले.

त्यानंतर बसने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. धुराचे लोट एवढे मोठे होते की बघ्यांची गर्दी झाली होती. आगीची तीव्रता मोठी होती. यात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. बसमध्ये 5 ते 6 प्रवाशी होते, अशी माहिती सांगण्यात आली आहे.



Share to