गुंठेवारीतील बांधकामे, घरे नियमित करण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी करा – नाना काटे
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील गुंठेवारीतील बांधकामे, घरे नियमित करण्याच्या प्रक्रियेची त्वरित अंमलबजावणी करून शहरवासीयांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे.
यासंदर्भात काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील गुंठेवारतील बांधकामे, घरे नियमित करण्यासाठी मागील काही दिवसापुर्वी महाविकास आघाडी सरकार तर्फे शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे त्या आदेशाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली नव्हती.
परंतु, आता गुंठेवारीतील घरे, बांधकामे प्रशमन शुल्क व विकास शुल्क स्विकारून नियमितीकरणाबाबत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दि. १८/१०/२०२१ रोजी सुधारित नवीन आदेश (शासि आदेश क्र.गुठेवा-1021/प्र.क्र.48/2021/नवि-३०) काढण्यात आला आहे. त्यानुसार आपण पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी. एक खिडकी योजनेच्या माध्यमातून नियमितीकरणाची प्रक्रिया चालू करुन शहरातील नागरिकांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.